अशोकनगर : लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अशोक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नुकताच एक अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला.
मातापूर येथील चि. प्रसाद विठ्ठल उंडे, जो डी. फार्मसीच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे, याने शिक्षण पूर्ण होताच “श्रीकृष्णा मेडिकल” या नावाने स्वतःचे मेडिकल स्टोअर सुरू करून एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन स्वबळावर उभा राहण्याचा त्याचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचा मुख्य उद्देश केवळ शैक्षणिक ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, उद्योजकता आणि आत्मनिर्भरता विकसित करणे हा आहे. प्रसाद उंडे यांच्या या यशस्वी उपक्रमामुळे “शिक्षणातून रोजगार आणि रोजगारातून समाजसेवा” हा संस्थेचा मूलमंत्र प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून येते.
“श्रीकृष्णा मेडिकल”च्या स्थापनेमुळे मातापूरसारख्या ग्रामीण भागात दर्जेदार औषध सेवा उपलब्ध झाली आहे. यापूर्वी नागरिकांना औषधांसाठी शहरांकडे जावे लागत होते; मात्र आता स्थानिक पातळीवरच विश्वासार्ह व परवडणारी सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील आरोग्य व्यवस्थेलाही मोठी बळकटी मिळणार आहे.
या मेडिकल स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, अशोक कारखान्याचे माजी संचालक राधाकिसन उंडे, मातापूर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब उंडे, माजी सरपंच बाळासाहेब दोंड, ह.भ.प. बाबा महाराज उंडे, सौ. ललिताताई मांढरे, शंकरराव उंडे, सोमनाथ उंडे, भाऊसाहेब उंडे, दत्तात्रेय दोंड, कानिफनाथ शिरोळे, बाबासाहेब शेळके, यशवंत धुमाळ, बाबासाहेब शिरोळे, अनिल गायके, पांडुरंग उंडे, लक्ष्मण उंडे, सचिन आढाव, राहुल उंडे, प्रमोद उंडे, निखिल मते, निखिल दोंड, श्रेयश दोंड, अनिल दोंड, सौ. सुनीता उंडे, गीतांजली शिरोळे, वंदना शिरोळे, मीराबाई भोसले आदी मान्यवर व ग्रामस्थानी उपस्थित राहून प्रसाद उंडे यांच्या धाडस, जिद्द आणि मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन बाबासाहेब आदिक, संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, सहसचिव विरेश गलांडे, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, संचालक निरज मुरकुटे, प्राचार्य प्रसाद कोते, तसेच सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक, कर्मचारी व त्याचे मनापासून अभिनंदन केले.
प्रसाद उंडे यांच्या यशामागे त्यांची अथक मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि कुटुंबीयांचा ठाम पाठिंबा आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी भविष्याचा विचार करून उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्याने व्यवसाय सुरू करून संस्थेचा झेंडा उंचावला असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
“श्रीकृष्णा मेडिकल” च्या माध्यमातून सुरू झालेली ही वाटचाल भविष्यात अधिक यशस्वी होवो, व्यवसायाचा विस्तार होवो आणि प्रसाद उंडे यांचे नाव एक यशस्वी उद्योजक म्हणून उंचावो, अशा सदिच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
अशोक कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याचा उद्योजकतेकडे यशस्वी प्रवास







