अध्याय…………………भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील एक सुवर्णपान अखेर मिटलं. आशा भोसले या अजरामर गायिकेचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आणि त्यासोबतच एका अखंड, समृद्ध संगीतयुगाचा अंत झाला. आशाताई या केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या भारतीय सांस्कृतिक विश्वाचा अविभाज्य आवाज होत्या. आठ दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी १५ हजार गीतं गायली, हा ही एक विक्रमच. त्यांच्या आवाजानं पडद्यावरील असंख्य नायिकांना जीव दिला आणि त्यांच्या ओठांवर उमटलेलं प्रत्येक गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं. त्यांच्या गायकीत विलक्षण बहुरंगीपणा होता. कोमल, भावस्पर्शी प्रेमगीतांपासून ते जोशपूर्ण, ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांपर्यंत त्यांनी प्रत्येक शैली सहजतेनं आत्मसात केली. संगीतकारांसाठी त्या एक विश्वासार्ह, सर्वगुणसंपन्न आवाज होत्या. त्यांच्या गायकीत केवळ सूर नव्हते, तर भाव, ऊर्जा आणि जीवन होतं. आशाताईंची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी आपला ठसा उमटवला. ब्रिटिश संगीतकारांसोबतच्या त्यांच्या सहकार्यामुळं त्यांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचला. ‘Brimful of Asha’ सारख्या गाण्यांमधून त्यांच्या प्रभावाची दखल पाश्चिमात्य जगानंही घेतली. त्यांच्या आवाजात एक अशी जादू होती, जी पिढ्या न पिढ्या लोकांना जोडत राहिली. त्यांच्या गाण्यांवर लोक नाचले, प्रेम केलं, विरह अनुभवला. त्यांची गाणी म्हणजे अनेकांच्या आयुष्याचं पार्श्वसंगीतच ठरली. आशाताई या केवळ एक नाव नव्हतं, तर त्या एक युग होत्या. त्यांना हे यश सहजासहजी मिळालेलं नाही. संघर्षातून तावून सुलाखून निघालेला त्यांचा प्रवास होता. आशाताईंचा संगीताशी संबंध अगदी लहानपणापासूनच जुळला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीताचे जाणकार आणि मराठी रंगभूमीवरील मान्यवर व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ अशा पाच मुलांमध्ये संगीताचे सूर बालपणापासूनच घुमत होते. लहानपणी लता आणि आशा यांची जोडी अतूट होती. आशाताई आपल्या मोठ्या बहिणीच्या सावलीसारख्या त्यांच्या मागोमाग फिरत असत. त्या नात्यात जिव्हाळा, शिकण्याची ओढ आणि एक न बोललेला आदर होता. पुढं आयुष्यानं त्यांना वेगवेगळ्या वाटांवर नेलं; पण त्या बालपणीच्या नात्याचा गोडवा आणि त्यातून मिळालेली संगीताची पायाभरणी आशाताईंच्या संपूर्ण कारकिर्दीत जाणवत राहिली.भारतीय संगीतविश्वात काही नावं केवळ कलाकार म्हणून मर्यादित राहत नाहीत, तर ती एक युग बनून जातात. आशा भोसले हे असंच एक अजरामर नाव. लहान वयात सुरू झालेल्या त्यांच्या संगीतप्रवासानं केवळ काळ ओलांडला नाही, तर प्रत्येक पिढीच्या भावविश्वाला स्पर्श करत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आशाताईंनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात अत्यंत कमी वयात केली. एका मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितलं होतं, की अवघ्या दहा वर्षांच्या असताना म्हणजे १९४३ साली त्यांनी त्यांचं पहिलं मराठी गाणं रेकॉर्ड केलं. त्या काळात मायक्रोफोन म्हणजे काय, रेकॉर्डिंग कसं होतं, याचीही त्यांना पुरेशी जाणीव नव्हती. भीती, कुतूहल आणि आत्मविश्वासाच्या मिश्र भावनांमध्ये त्यांनी ते पहिलं गाणं गायलं; पण याच अनुभवानं त्यांच्या मनात एक ठाम विश्वास निर्माण केला, ‘मीही गाऊ शकते.’ आणि याच क्षणापासून एका महान प्रवासाची नांदी झाली. त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास मात्र सोपा नव्हता. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत, कधी कधी पहाटेपर्यंत चालणाऱ्या रेकॉर्डिंगच्या कठोर दिनचर्येत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. या श्रमांनीच त्यांच्या आवाजाला धार दिली आणि त्यांना एक परिपूर्ण, समर्पित कलाकार म्हणून घडवलं. आशाताईंची खरी ताकद त्यांच्या बहुविधतेत होती. त्यांनी तब्बल २० भाषांमध्ये १५ हजारांहून अधिक गाणी गायली. हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, उर्दू, गुजराती, इंग्रजीपासून ते रशियनपर्यंत विविध भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. ही अभूतपूर्व कामगिरी ‘ग्रिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड’मध्ये मध्ये नोंदली गेली. हे त्यांच्या कलेच्या जागतिक मान्यतेचं द्योतक आहे. गायनाच्या शैलीबाबत बोलायचं झाल्यास, त्यांनी कोणतीही चौकट मान्य केली नाही. शास्त्रीय संगीताची बांधणी असो, गझलची कोमलता असो, कव्वालीचा उत्साह असो, की कॅबरे आणि पॉपमधील चैतन्य;प्रत्येक प्रकार त्यांनी तितक्याच सहजतेनं आणि प्रभावीपणे साकारला. त्यांच्या आवाजानं प्रत्येक गाण्याला एक वेगळी ओळख दिली, जी आजही तितकीच ताजी आहे. ‘पिया तू अब तो आजा’, ‘ये मेरा दिल’, ‘ओ हसीना जुल्फों वाली’, ‘मैं प्यार का राही हूं’, ‘दीवाना हुआ बादल’ यांसारखी असंख्य गाणी त्यांच्या स्वरांनी अजरामर झाली. ही गाणी केवळ संगीत नाहीत, तर काळाच्या प्रवाहात कोरलेले सांस्कृतिक ठसे आहेत. त्यांच्या या अप्रतिम योगदानाची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार यांसारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरवलं. हे पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाची केवळ पावती नसून, भारतीय संगीतविश्वावर त्यांच्या असलेल्या अधिराज्याची साक्ष आहेत.आजच्या काळात, जेव्हा मनोरंजन उद्योगात वेगानं बदल होत आहेत, तेव्हा आशा भोसले यांचं स्थान अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यांनी दाखवून दिलं, की यश हे केवळ प्रतिभेवर अवलंबून नसतं; तर ते धाडस, सातत्य आणि बदल स्वीकारण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असतं. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर नव्यानं सुरुवात केली आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केलं. त्यांच्या करियरचा वेध घ्यायचा तर एक महामालिका तयार करावी लागेल, तरीही त्यात काही कमतरता राहील. इतकं आणि असं अफाट कर्तृत्व आणि प्रतिभा असलेलं हे कायमच मनानं तारुण्यात असलेलं व्यक्तिमत्व आहे. ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’ ( तिसरी मंझिल), ‘दिल चीज क्या है मेरी’ (उमराव जान), ‘मेरा कुछ सामान’ (इजाजत) ही तीनही गाणी एकाच गायिकेची आहेत, यावर पटकन विश्वास बसत नाही; पण ती आशा भोसले यांनीच गायलीत ही वस्तुस्थिती आहे, यातच त्यांच्या गायिकीची रेंज, त्यावरचं प्रभूत्व लक्षात येतं. आपल्या जगभरातील अनेक देशांतील स्टेज शोजमध्येही त्या संपूर्ण स्टेजवर आपल्या व्यक्तिमत्व आणि उत्फूर्त गायनाचा प्रभाव दाखवत. आशाताईंच्या यांची मराठीतील वाटचालीबद्दल बरंच सांगता येईल. संगीतकार वसंतराव पवार यांच्या ‘बाळा जो जो रे’ या चित्रपटातील आठपैकी सहा गाणी, तर ‘तू सुखी रहा’ या चित्रपटातील सहाही गाणी आशाताईंची आहेत. शिवलीला (सहा गाणी), चिमणी पाखरं (चार), स्री जन्मा तुझी कहाणी (सात), पुनवेची रात (आठ), सांगत्ये ऐका (सहा), साता जन्माचे सोबती (पाच) अशी गाणी त्यांनी गायिली आहेत. राम कदम यांच्या संगीतात ‘नाचू किती लाजू किती’ (सुगंधी कट्टा), ‘घुंगरु आज कशी रुसली’ (सुगंधी कट्टा), ‘मीच गेले जवळ’ त्याच्या (वऱ्हाडी आणि वाजंत्री), ‘सांगू कसं मी तुला’ (पतिव्रता), ‘आले अमृत घट घेऊन मी’ (राजमान्य राजश्री) इत्यादी गाणी त्यांनी गायली आणि अतिशय प्रतिष्ठित अशा राज्य चित्रपट महोत्सवात त्यांनी एकूण अठरा वेळा पुरस्कार पटकावले. त्यांची कहाणी ही केवळ एका गायिकेची यशोगाथा नाही, तर ती एका स्त्रीची स्वतःला शोधण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची आणि समाजाच्या अपेक्षांपलीकडं जाऊन जगण्याची कहाणी आहे. त्यांच्या आवाजात भारतीय समाजातील बदल, संघर्ष आणि आकांक्षा यांचं प्रतिबिंब दिसतं. त्यांनी आपल्या कलेतली विविधता कायम ठेवली. ‘उमराव जान’ मधील गझलांमध्ये त्यांनी दाखवलेली सूक्ष्मता आणि भावनिक गूढता ही त्यांच्या कलेची दुसरी बाजू उलगडते. ‘मेरा कुछ सामान’ या गाण्यात त्यांनी मुक्तछंद कवितेला संगीतबद्ध करून एक नवा प्रयोग साकारला. हे गाणं पारंपरिक चौकटीत बसत नाही; पण ते श्रोत्याच्या मनात खोलवर रुजतं. हीच आशा भोसले यांच्या कलेची खरी ताकद आहे, ती मर्यादांना ओलांडते. त्यांच्या आवाजाची वैशिष्ट्यं ही केवळ तांत्रिक नाहीत, तर भावनिक आहेत. त्यांचा आवाज एकाच वेळी अनेक स्तरांवर काम करतो. तो मोहक आहे, खेळकर आहे, वेदनादायी आहे आणि कधी कधी बंडखोरही आहे. त्या श्रोत्याशी एक वैयक्तिक नातं निर्माण करतात. त्यामुळेच त्यांची गाणी केवळ ऐकली जात नाहीत, तर अनुभवली जातात. आज त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांचा स्वर अजूनही जिवंत आहे. प्रत्येक सुरात, प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक आठवणीत. त्या केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या भारतीय संगीताच्या इतिहासातील एक अखंड, अमर अध्याय होत्या.
---Advertisement---
ताज्या बातम्या
राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात
August 26, 2026
क्रिकेट बॉल्स मध्ये ‘ए३ स्पोर्ट्स क्राफ्ट’ची मोठी झेप
July 30, 2026







