सोनई : घोडेगाव- राजेगाव रस्त्यावर असलेल्या पंढरीनाथ महाराज वारकरी संस्थेत सद्गुरु माधवबाबा लांडेवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंतरराष्ट्रीय किर्तीच्या वादक व पुणे येथील मृदंगालय पखवाज अकॅडेमीच्या संचालिका अनुजा बोरुडे-शिंदे यांचा मृदंग व सोलो वादनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. ग्रामीण भागात प्रथमच झालेल्या कार्यक्रमाचे भाविक व रसिक श्रोत्यांनी जोरदार स्वागत केले.वारकरी आश्रमात एक दिवसीय सोहळ्याचे उदघाटन घोडेगावचे माजी सरपंच राजेंद्र देसरडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले. आश्रमाचे अध्यक्ष रामेश्वर महाराज राऊत शास्री यांनी संस्थेची व एक दिवसीय कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी पंढरीनाथ महाराज तांदळे, वैभव महाराज काळे, निलेश महाराज कडू, आनंदवन संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले, शहाराम तांदळे, ज्ञानदेव बोरुडे, अंबिका तांदळे,भरत तांदळे, विष्णु कुत्तरवाडे, प्रदीप शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमात ताल चौताल मधील पारंपरिक स्तुती परण,रेला, साधारण चक्रधार, फर्माईश चक्रधार सादर करताना उत्कृष्ट मृदंग व सोलो वादन केले.कार्यक्रमात गोपुच्छा यती,स्वरचित श्रीराम स्तुती सादर करताना उपस्थित भाविकांनी ‘जय राम श्रीराम’ नामाचा सत्संग केला. अनुजा बोरुडे यांना रोशन निवळकर (संवादिनी) राजन साटम (पखवाज) यांनी संगीत साथ दिली. लक्ष्मण तांदळे यांनी सुत्रसंचालन केले. डाॅ. रामनाथ बडे यांनी आभार मानले. मेजर हरी तांदळे परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.
पंढरीनाथ महाराज वारकरी संस्थेत अनुजा बोरडे यांची मृदंग व सोलो वादनाची सेवा







