श्रीरामपूर : श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख यांनी आपला स्विकृत नगरसेवक पदाचा अवघ्या तीन महिन्यातच राजीनामा दिल्यामुळे श्रीरामपूर शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अंजुमभाई शेख यांनी अचानकपणे स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा आ. हेमंत ओगले यांच्याकडे दिला असून त्याची प्रत नगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्याकडे दिल्याचे समजते. दरम्यान व्यक्तिगत कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात अंजुम शेख यांनी म्हटले असले तरी यामागील खरे कारण मात्र समजू शकले नाही. या निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत
श्रीरामपूर नगरपालिकेच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ अंजुम शेख यांनी काम केले आहे. ते आणि त्यांच्या पत्नी सौ. समिना शेख हे दोघेही पालिकेत बिनविरोध नगरसेवक म्हणून यापूर्वी निवडून आलेले आहेत. अंजुम शेख हे अनेक वर्षे नगरसेवक म्हणून राहीलेले आहेत. उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला रूळाच्या पलिकडील जास्तीत जास्त काँग्रेसच्या जागा निवडून आणण्यात अंजुम शेख यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. यावेळेस मात्र अंजुम शेख हे निवडणूक रिंगणात उतरले नव्हते. परंतु पालिका निवडणुकीच्या घवघवीत यशात त्यांचा मोठा वाटा असल्याने काँग्रेस पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
मंत्रालयात भेटीनंतर निर्णय
अंजुम शेख यांनी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले आणि करण ससाणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एका ज्येष्ठ मंत्र्याची भेट घेतली. त्यानंतर श्रीरामपूरला आल्यावर अंजुम शेख यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.







