सोनगाव, प्रतिनिधी (दि. १६ एप्रिल २०२६) — सात्रळ येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या गुणवंत कामगिरीचा सन्मान करताना शाळेचा परिसर आनंद आणि अभिमानाने भरून गेला.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून योगेश चोरमुंगे सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.ऑलिंपियाड (इंग्लिश, गणित, विज्ञान व सामान्य ज्ञान) परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच टी आय एस डी, मुंबई यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित “संविधान लेखन” हस्ताक्षर स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी शिक्षिका सौ. मंजुषा घोलप मॅडम यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.प्रमुख अतिथी योगेश चोरमुंगे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत व सातत्य यांच्या जोरावर शैक्षणिक प्रगती साधण्याचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास शाळेचे चेअरमन डॉ. के. के. बोरा सर, कार्यकारी अध्यक्ष राहुल बोरा सर, प्राचार्या प्रधान मॅडम, उपप्राचार्या साबळे मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारंभ उत्साहात पार पडत विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला.
‘आनंद गुरुकुल’मध्ये गुणवंतांचा गौरव; पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न’







