ग्रामीण भागात आधुनिक शेती जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार
लोणी :लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र संस्था, लोणी अंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सादतपूर येथे गावप्रवेश उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कृषिदूतांचे जल्लोषात स्वागत करत त्यांच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.गावचे सरपंच नारायण गुंजाळ यांच्या हस्ते कृषिदूत गटप्रमुख यश शेळके तसेच अभय मगर, हर्षल शेळके, रोहन कदम, विकास घोडके, रोहन खांदे, सिद्धेश पडोळ आणि तेजस मांडे यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, शासनाच्या कृषी योजना तसेच कृषीपूरक व्यवसायांविषयी माहिती देण्याचा संकल्प व्यक्त केला.या उपक्रमासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, कृषी शिक्षण संचालक डॉ. उत्तमराव कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष वर्पे, विभागप्रमुख प्रा. प्रदीप मखरे, कार्यक्रम समन्वयक प्रा. अश्विनी घाडगे आणि प्रा. सत्येन खर्डे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.यावेळी उपसरपंच दिलीप मगर, ग्रामपंचायत सदस्य सागर कडलग, सोसायटी चेअरमन अजय शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश गोरे तसेच संजय मगर, रमेश मगर, बबनराव काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत विद्यार्थी गाव सर्वेक्षण, शेतभेटी, शेतकरी मार्गदर्शन, कृषी विस्तार उपक्रम तसेच विविध प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळून शेती विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.







