सात्रळ : लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एम . एस्सी. अनालिटिकल केमिस्ट्रीच्या ३६ विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. त्यात मॅक्लॉइड्स फार्मासिटिकल गुजरात, सन फार्मासिटिकल अहिल्यानगर , इपका पुणे, लुपिन पुणे या आंतरराष्ट्रीय कंपन्याचा समावेश असून उर्वरित ०७ विद्यार्थ्यांना विविध बँकिंग क्षेत्र आणि सात्रळ दुध डेअरी येथे नोकरीची संधी मिळाली आहे. यात १३ विद्यार्थिनींचा समावेश असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी दिली. ग्रामीण भागातील गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या उक्तीनुसार शिक्षणाची समान संधी प्राप्त व्हावी, यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी उच्च शिक्षणाची प्रकाशवाट प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून खेडोपाडी पोहोचवली. संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विविध विद्यार्थी हिताचे उपक्रम तसेच कौशल्याधिष्ठीत ज्ञान देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना प्लेसमेंट व नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी सात्रळ महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत असल्याचे डॉ. शिंगोटे यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये सात्रळ महाविद्यालयातील ४३ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त झाल्याबद्दल यशस्वी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष व जलसंपदा मंत्री तथा पहिले अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मा. मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सचिव श्री. भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे शिक्षण संचालक व प्राचार्य प्रा. डॉ. प्रदीप दिघे, सात्रळ महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, प्लेसमेंट अधिकारी आणि महाविद्यालयाचा स्टाफ यांनी अभिनंदन केले आहे.
सात्रळ महाविद्यालयातील ४३ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी







