पुणे : भारती विद्यापीठ धनकवडी शैक्षणिक संकुलातील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे “रेडिफायनिंग हॉस्पिटॅलिटी : बियॉन्ड सर्व्हिस टू सोशल इम्पॅक्ट” या विषयावर एकदिवसीय सेमिनार उत्साहात पार पडला. या सेमिनारचे प्रमुख वक्ते वेस्टिन हॉटेल, पुणे येथील महाव्यवस्थापक विक्टर चेन यांनी ‘पीपल-फर्स्ट लीडरशिप’, उत्कृष्टता, प्रामाणिकपणा, जुळवून घेण्याची क्षमता आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी त्यांच्या हॉटेल साखळीतील कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांची माहिती देताना गरजू मुलींसाठी शैक्षणिक सहाय्य, पर्यावरण संवर्धन मोहिमा तसेच कुष्ठरोगग्रस्त रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला.त्यानंतर बेलोना हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापकीय संचालकचे प्रशांत लीसार यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव मांडले. त्यांनी सहानुभूती, प्रामाणिकपणा आणि संधींना सकारात्मक प्रतिसाद देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या उपक्रमांद्वारे दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची माहिती देत ‘उद्देशपूर्ण आतिथ्य’ ही संकल्पना स्पष्ट केली.तिसऱ्या सत्रात गुडफेलोज, मानव संसाधनच्या प्रमुख,सायली घरत यांनी “गुडफेलोज” या जनरेशन झेड आधारित स्टार्टअप उपक्रमाची ओळख करून दिली. या उपक्रमाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सहवास व भावनिक आधार देण्याचे कार्य केले जाते. त्यांच्या सत्रात मानवी नातेसंबंध आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व विशेषत्वाने मांडण्यात आले. प्राचार्या डॉ. ललिता चिरमुले म्हणाल्या, आतिथ्य क्षेत्राची भूमिका बदलत असून केवळ ग्राहक सेवेत मर्यादित न राहता सामाजिक व पर्यावरणीय परिणाम साधण्याकडे होत आहे.आभार डॉ. सुनिता सांगळे यांनी मानले. या सेमिनारमुळे विद्यार्थ्यांना आतिथ्य क्षेत्र केवळ सेवा देणारे नसून सामाजिक परिवर्तन घडविणारे प्रभावी साधन ठरू शकते, याची जाणीव झाली आणि नव्या उद्दिष्टांसाठी प्रेरणा मिळाली.
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये एकदिवसीय सेमिनार संपन्न







