सरकारने शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांच्या पाठीशी ही उभे राहावे
अहिल्यानगर / संगमनेर ( प्रतिनिधी ) शेजारील कर्नाटक राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शासनाने तातडीने निर्णय घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच इतर भागांमधून किंवा इतर राज्यांमधून चारा उपलब्ध करून द्यावा. राज्य सरकारने शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांच्या पाठीशी उभे राहावे अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत बोलताना काँग्रेस नेते मा.कृषी व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यामध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होत असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यंदा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयाबीन सारखी पिके शेतातून काढण्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो. परंतु शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरले नाही. पाणी नसल्यामुळे रब्बी हंगाम हाती येण्याची शक्यता उरलेली नाही. येत्या काळात पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण टंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असून विशेषता दुधाळ जनावरांचे संगोपन करणे शेतकऱ्यांसाठी कठीण काम झाले आहे.
पिकेच नसल्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. रोज कमावून रोज खाणाऱ्या शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने शेतकऱ्यांबरोबरच शेतमजुरांसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शेजारील कर्नाटक राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही शासनाने तातडीने निर्णय घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच इतर भागांमधून किंवा इतर राज्यांमधून चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. दुष्काळाच्या सुरुवातीलाच आम्ही सरकारवर थेट आरोप करू इच्छित नाही परंतु सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकरी,शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले.





