भारताच्या विविध भागांमध्ये आजही असंख्य हस्तलिखिते घरांमध्ये आणि संस्थात्मक संग्रहांमध्ये जतन केलेली आहेत. या विखुरलेल्या ज्ञानसंपदेची माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने ‘ज्ञान भारतम्’ राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.या अभियानाचा उद्देश देशभरातील हस्तलिखितांची ओळख, नोंदणी, दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि डिजिटायझेशन करणे हा आहे.
१ कोटीहून अधिक नोंदी
या अभियानाअंतर्गत १ कोटीहून अधिक हस्तलिखितांची नोंद झाल्याचे अभियानाच्या उपलब्ध माहितीत नमूद करण्यात आले आहे. ही संख्या केवळ आकडा नाही. प्रत्येक नोंद भारताच्या लिखित ज्ञानवारशातील एका महत्त्वाच्या ठेव्याची ओळख निर्माण करते.या हस्तलिखितांमध्ये तत्त्वज्ञान, धर्म, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र, साहित्य आणि इतर विविध विषयांवरील ज्ञान आढळू शकते.
महाराष्ट्राचा सहभागही महत्त्वाचा
महाराष्ट्राला संतपरंपरा, साहित्य, तत्त्वज्ञान आणि विविध ज्ञानशाखांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे राज्यातील घरांमध्ये, मंदिरांमध्ये, मठांमध्ये, ग्रंथालयांमध्ये आणि विविध संस्थांमध्ये असलेल्या हस्तलिखितांची नोंद होणे महत्त्वाचे आहे.पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या ज्ञान आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री मा. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाला महत्त्व दिले जात आहे.
तुमचा हस्तलिखित वारसा सुरक्षित ठेवा
या अभियानातील महत्त्वाची बाब म्हणजे हस्तलिखिताची मालकी तुमचीच राहणार आहे.शासनाकडून हस्तलिखितांचे संपूर्ण डिजिटायझेशन करण्यात येणार असून, त्यावरील खर्चही शासनाकडून केला जाणार आहे.तुमच्याकडे प्राचीन हस्तलिखिते असल्यास त्यांची माहिती नोंदवा.www.gyanbharatam.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल ॲप वापरा.१ कोटीहून अधिक हस्तलिखितांची नोंद झाली आहे; तुमच्या संग्रहातील हस्तलिखिताची नोंद झाली आहे का?








