- श्री मावळी मंडळ, ठाणे आयोजित “७३वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा-२०२६.
ठाणे : ओम् वर्तकनगर, स्वराज्य स्पोर्टस्, विवेक स्पोर्टस्, मिडलाईन यांनी श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” उपांत्य फेरी गाठली. पुरुषांत श्रीराम विश्वस्त, जय हनुमान, डॉन बॉस्को, मिडलाईन यांनी उपांत्य फेरी गाठण्याचा मान पटकविला. ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या भव्य पटांगणावर सुरु असलेल्या चौथ्या दिवशी महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाण्याच्या ओम् वर्तकनगरने ठाण्याच्या जय भारत स्पोर्टस् चा ४१-१४ असा धुव्वा उडवीत आगेकूच केली. सुरुवातीपासुन आक्रमक खेळ करीत पूर्वार्धात २ लोण देत २५-०६ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत सामन्यावरील पकड घट्ट करीत मोठ्या फरकाने सामना खिशात टाकला. वैष्णवी साळुंखे, पूर्वा इंगवले, पूजा जाधब यांचा चतुरस्त्र खेळ या विजयात महत्वाचा ठरला. जय भारतची श्रेया गावंड एकाकी लढली. दुसऱ्या सामन्यात उपनगरच्या स्वराज्य स्पोर्टस् ने मुंबईच्या बलाढ्य अशा शिवशक्ती महिला संघाचा प्रतिकार ३५-३३ असा मोडून काढला. पहिल्या डावात १०-२० अशा १० गुणांनी पिछाडीवर पडलेल्या स्वराज्यने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. सानिका चौघुले, याशिका पुजारी यांच्या तुफानी चढयांना समृद्धी मोहिते, प्रतिक्षा तांडेल यांची मिळालेली बचावाची भक्कम साथ यामुळे स्वराज्यने विजय मिळविला. शिवशक्तीच्या शुभदा खोत, ऋणाली भुवड, पौर्णिमा जेधे यांचा पहिल्या डावातील जोश दुसऱ्या डावात टिकला नाही.
ठाण्याच्या विवेक स्पोर्टस् ने रायगडच्या कर्नाळा स्पोर्टस् ला ३९-१६ असे नमवीत उपांत्य फेरी गाठली. विश्रांतीपर्यंतच्या खेळात एक लोण देत १९-०९ अशी आघाडी घेणाऱ्या विवेकने विश्रांतीनंतर आणखी दोन लोण देत आपला विजय सोपा केला. स्वीटी, तन्नू, हरजीत, सनाया यांनी विवेक स्पोर्टस् कडून उत्कृष्ट खेळ केला. कर्नाळा स्पोर्टस् च्या अंकिता घारे, तेजा सपकाळ बऱ्या खेळल्या. शेवटच्या सामन्यात मिडलाईन अकॅडमीने मध्यंतरातील २१-२२ अशा एका गुणाच्या पिछाडीवरून शिवमुद्रा स्पोर्टस् ला ३९-३७ असे चकवीत उपांत्य फेरी गाठली. हर्षा शेट्टी, मोक्ष पुजारी, सिद्धी यांच्या संयमी खेळाला याचे श्रेय जाते. शिवमुद्राच्या रितिका फुलसुंगे, दिव्या रावत, साक्षी रहाटे यांचा खेळ संघाला विजयी करण्यात कमी पडला. पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईच्या श्रीराम विश्वस्तने उपनगरच्या स्वस्तिक मंडळाला ३१-२० असा पाडाव केला. तुषार शिंदे, अंकुश पारले, आदित्य पारले यांच्या जोशपूर्ण खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अक्षय बरडे, ऋत्विक कांबळी यांचा खेळ स्वस्तिकला विजय मिळवून देण्यात कमी पडला. ठाण्याच्या जय हनुमानने उपनगरच्या सिद्धार्थ मंडळावर २७-२१ अशी मात केली. पूर्वार्धात लोण देत १५-०३ अशी आघाडी घेणाऱ्या जय हनुमानला उत्तरार्धात सिद्धार्थने कडवी लढत दिली. उत्तरार्धात सिद्दार्थने टॉप गिअर टाकत लोणची परतफेड करीत सामना रंगतदार केला. पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले. ओम् सिंग, गौरव पाटील, राज पाटील यांच्या चढाई पकडीच्या खेळाने जय हनुमानने हा विजय साकारला. नरेश, अंकित लढत यांनी सिद्धार्थ कडून जोरदार लढत दिली. ठाण्याच्या डॉन बॉस्कोने जीत सिंग, अनिकेत पाटील, विनायक गवारे यांच्या झंझावाती खेळाच्या जोरावर ठाण्याच्या विवेकस्मृती संघाला ३७-१५ असे नमविले. विवेकस्मृतीचा रोहन पाटील चमकला. शेवटच्या चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात नांदेडच्या मिडलाईनने जय हनुमानला ३८-३१ असे चकविले. विश्रांतीला १८-१९ अशा पिछाडीवर पडलेल्या मिडलाईनने नंतर मात्र जोशपूर्ण खेळ करीत विजय साकारला. धीरज बैलमारे, पवन आडे, कल्पेश भाखे यांच्या धूर्त खेळाला या विजयाचे श्रेय जाते. जय हनुमानच्या ओम् सिंग, वैभव मोरे, परेश नाखरे यांचा खेळ विश्रांती नंतर थंडावला.
उप उपांत्यपूर्व फेरीचे निकाल संक्षिप्त महिला :-
१) कर्नाळा स्पोर्टस् वि. वि. स्नेहविकास २६-१८, २)जय भारत स्पोर्टस् वि. वि. एस. आय. ई. एस. २६-२५, ३)शिवमुद्रा स्पोर्टस् वि. वि. श्रीराम कबड्डी संघ ३१-२९, ४)स्वराज्य स्पोर्टस् वि. वि. जय अंबे ४३-१८, ५)मिडलाईन वि. वि. शिवतेज ६०-२४, ६) शिवशक्ती वि. वि. श्री माऊली ६२-१७.
उप उपांत्यपूर्व फेरीचे निकाल संक्षिप्त पुरुष :-
१)डॉन बॉस्को वि. वि. नव तरुण ४७-३१, २)स्वस्तिक वि. वि. श्री स्वामी समर्थ ३६-३२, ३)मिडलाईन वि. वि. अश्वमेघ ४९-१८, ४)ग्रीफिन्स जिम. वि. वि. होतकरू ३३-१६, ५) श्रीराम विश्वस्त वि. वि. उजाला ३६-३४, ६)शिवमुद्रा वि. वि. सत्यम सेवा ४५-२४.








