सोनगाव : राहुरी तालुक्यातील धानोरे येथे श्री धनेश्वर महाराजांच्या देवभार यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक कुस्ती स्पर्धेने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. मातीच्या आखाड्यात रंगलेल्या थरारक आणि चुरशीच्या कुस्त्यांनी ग्रामस्थांना अक्षरशः खिळवून ठेवले.डफ-ताशांच्या गजरात आणि ‘बजरंग बली’च्या जयघोषात स्पर्धेला सुरुवात झाली. पंचक्रोशीतील बलाढ्य तसेच नवोदित मल्लांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रत्येक झुंज ही जिद्द, ताकद आणि डावपेचांची कसोटी ठरत होती. काही लढतींमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा कायम राहिल्याने प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत मल्लांना दाद दिली.अनेक कुस्त्या विशेष ठरल्या. अनुभवी मल्लांनी आपला दबदबा दाखवला, तर नवोदितांनीही जोरदार लढती देत आपले कौशल्य सिद्ध केले. महिला कुस्तीपटूंच्या उपस्थितीने स्पर्धेला वेगळीच उंची मिळाली. त्यांच्या सहभागामुळे आखाड्यातील वातावरण अधिकच रंगतदार झाले.यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विजेते व उपविजेते मल्लांना रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कुस्ती क्षेत्रातील वस्ताद मंडळींचाही गौरव करण्यात आला. पारंपरिक कुस्ती संस्कृती जपण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमास धनेश्वर देवस्थानचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व अहिल्यानगर जिल्ह्यातील नामवंत मल्ल उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत प्राप्त झाली.दरम्यान, यात्रेनिमित्त कावड व काठीची भव्य मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. गावात उत्साहाचे वातावरण होते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. रात्री पार पडलेल्या लावणी कार्यक्रमाने यात्रेच्या उत्सवात आणखी रंग भरला.
धनेश्वर देवभार यात्रेत कुस्त्यांचा थरार; धानोऱ्यात आखाडा गाजला








