देवगाव : संगमनेर तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात अभिमान वाढवणारी कामगिरी करत श्री श्री रविशंकर क्रिकेट ॲकॅडमीची विद्यार्थिनी अदिती सागर राऊत हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या निवड चाचणीत निवड झाली आहे. दि. ६ एप्रिल रोजी पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत अदितीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपले स्थान निश्चित केले.
अदिती राऊत ही गेल्या सात वर्षांपासून संगमनेर येथील श्री श्री रविशंकर क्रिकेट ॲकॅडमीत नियमित सराव करत असून, हेड कोच योगेश कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिची क्रीडा वाटचाल घडत आहे. तसेच आदीप वाघ सर, अभिषेक कदम सर व प्रथमेश हासे सर यांचेही तिला मोलाचे प्रशिक्षण लाभले आहे.
याशिवाय स्वाती शहा, नैमिश सराफ यांच्या मार्गदर्शनामुळे अदितीच्या कौशल्याला अधिक धार मिळाली. विशेष म्हणजे, अदितीची यापूर्वी २०२३ साली महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील महिला क्रिकेट संघातही निवड झाली होती.
तालुका स्तरावर प्रशिक्षण घेत राज्य पातळीवर झेप घेणारी अदिती राऊत ही संगमनेरकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संगमनेरच्या अदिती राऊतची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड








