शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

शेतकऱ्यांचे म. ज्योतिबा फुले

---Advertisement---
११ एप्रिल,क्रांतिज्योती म.फुले यांची जयंती.म.फुले यांच्या सामाजिक कार्याबद्दल सर्वांना माहिती आहे.तथापि,म.फुले यांनी दिडशे वर्षांपूर्वी शेती क्षेञ आणि ग्रामविकासाबाबत जे विचार मांडले,ते नक्कीच अभ्यासावे असे आहेत.शेती क्षेञाची अर्थशास्ञिय मांडणी सर्वात प्रथम म.फुले यांनी केली.त्यांनी जे विचार मांडले ते शेतकरी चळवळीसाठी दिशादर्शर्क आहेत. यामुळेच म.फुले शेतकऱ्यांचेबाबतच्या विचारांचा शेतकरी चळवळीतील व्यक्तींनी अभ्यास करणे गरजेचे ठरते.

आपल्या देशात शेतीच्या अर्थशास्त्राच्या आधाराने अभ्यास सर्वप्रथम कोणी केला असेल, तर म.ज्योतिराव फुले यांचाच निखालसपणे उल्लेख करावा लागेल. दिडशे वर्षांपुर्वी म.फुले यांनी शेतीचे अर्थशास्त्र, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांचे आर्थिक परिवर्तन यासंदर्भात केलेले विवेचन आजच्या उच्चशिक्षित अर्थशास्त्रज्ञांनाही अचंबित करायला लावील असे आहे. म.फुले यांनी त्यांचा ‘शेतकऱ्यांचा असूड’ यातून ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या लिखाणातून त्यांच्यातील द्रष्टा अर्थशास्त्रज्ञच समोर येतो.
विद्येविना मती गेली । मतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले । वित्ताविना क्षुद्र खचले ।
इतके सारे एका अविद्येने केले॥
यातून म.फुले यांनी शिक्षण आणि अर्थशास्त्राचे महत्व अधोरेखित केले आहे. दिडशे वर्षापुर्वीच्या या विचारांत किती तथ्य आहे, हे आज कळेल. शेतकरी समाजाने शिक्षण नाकारले. शेतीला व्यवसाय न मानता केवळ उदरनिर्वाहाचे साधन मानले. याचा अचुक फायदा चतूर व्यापार व्यस्थेने घेतला. ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पिठ खातं’ अशी शेतकऱ्यांची अवस्था बनली. त्यात शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न शासन दरबारी मांडण्यात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी अपयशी ठरले. या सर्वांमधून शेतकऱ्यांच्या शोषणाची व्यवस्था उभी राहिली.
आजचे तथाकथित सम्राट, महर्षि,लोकनेते, कार्यभूषण अशा भूमिपुत्रांना व राज्यकर्त्यांना जे शहापण अजूनही सुचत नाही, ते शहाणपण ज्योतिबांनी दिडशे वर्षापुर्वी ब्रिटीशांना शिकविले! यातच ज्योतिबांना ‘महात्मा’ कां म्हणतात, याचे उत्तर गवसते.
म.फुले यांनी ब्रिटीश शासनाशी शेती आणि ग्रामविकासाबाबत केलेला पत्रव्यवहार, हा तर शेतकऱ्यांच्या चळवळीसाठीचा खजिनाच आहे. त्यांच्या पत्रव्यवहारातून त्यांनी ब्रिटीश शासनाने त्यांचेकडील जोमदार बियाणे इकडे आणून त्यांचा गावराण वाणांशी संकर करावा. परदेशी अधिक दूग्धोत्पादन देणाऱ्या गायींच्या सिद्ध वळूंचे विर्य आणून त्याचा भारतीय गायींशी संकर करावा इतकी दूरगामी वैज्ञानिक सुचना दिडशेवर्षापुर्वी करणे, अचंबित करणारे आहे.!
ज्या गोष्टींचे महत्व ब्रिटीशकाळात म.फुले यांना उमगले, त्याची अंमलबजावणी आपण स्वातंत्र्यानंतर हरितक्रांती व श्वेतक्रांतीच्या निमित्ताने आपण केली! हे ध्यानात घेतल्यास म.फुले यांच्या दूरदृष्टीची व्याप्ती आणि कक्षा ध्यानात येईल. एक भारतीय शेतकऱ्यांचा नेता ब्रिटीशांसारख्या प्रगत लोकांना काय करावे हे सुचवित होता. हे ध्यानात घेतलं तर फुलेंच्या व्यक्तिमत्वाची उंचीची कल्पना येईल.
आज सुशिक्षित पिढी शेतीत आली. हा सुशिक्षित घटक चळवळीतही येताना दिसतोय. तथापि; आजही तो चाचपडतोय. शिक्षण असूनही तो दिशाहीन आहे. संघटित होवूनही उपेक्षित आहे. याचे प्रमुख कारण जे अर्थशास्यिय व शास्ञिय चिंतन, मनन व अभ्यास म.फुले यांनी त्याकाळी केला. त्यावर लिखाण केले. ते शेतकरी चळवळीतल्या किती जणांनी वाचले, अभ्यासले, हा प्रश्न आहे. तसे असते, तर शेतकऱ्यांची व शेतकऱ्यांच्या चळवळीची उपेक्षा झालीच नसती. शेतकरी चळवळ दिशाहिन होवून भरकटली नसती.आज जे शेतकऱ्यांच्या चळवळीत आहेत त्यांनी ज्योतिरावांना जाणून घेतले पाहिजे.
जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे एकाएकी परिवर्तन घडत नसते. परिवर्तनासाठी मानसिकता बदलावी लागते. लोकांच्या मनाची व मेंदूची मशागत करावी लागते. मशागतीनंतर वैचारिक परितर्वनाचे बियाणे रुजवावे लागते. त्यानंतर परिवर्तन घडते. त्याचप्रमाणे क्षणिक असंतोषाने व प्रतिके यांनी राज्यकर्त्यांना जाग येत नसते. त्यांना वठणीवर आणण्यासाठी म.फुले सारखा विचारांचा ‘असूड’ शासन व्यवस्थेवर उगारावा लागतो. यासाठी शेतीतल्या तरुणाईने महात्मा फुलेंचे विचार जाणून घेतले पाहिजे,हे म.फुले यांच्या जयंतीनिमित्त आग्रहाने सांगावेसे वाटते.

भास्कर खंडागळे,
बेलापूर, (९८९०८४५५५१ )

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now

    Leave a Comment