- सीएसटी -दादर वाहतूक तब्बल साडेसात तास राहणार ठप्प
- लाखो प्रवाशांची होणार ‘रखडपट्टी’
मुंबई : जवळपास १२५ वर्षे जुना एलफिन्स्टन पूल नूतनीकरणासाठी शनिवारी रात्री पूर्णपणे जमिनदोस्त केला जाणार आहे. पूल पाडकामाचा अंतिम टप्पा पूर्णत्वास नेण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दादर स्थानकांदरम्यान साडेसात तासांचा ‘जम्बो ब्लाॅक’ घेतला आहे. शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत सीएसएमटी ते दादर रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. याकाळात अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असून मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. ब्लाॅकचा संपूर्ण रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने लाखो प्रवाशांची शनिवार आणि रविवारच्या प्रवासात रखडपट्टी होणार आहे.त्यामुळे मुंबईकरांनी या काळात घराबाहेर पडताना काळजी घेण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या संभाव्य हालाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी एलफिन्स्टन पूलाचे पाडकाम हाती घेण्यात आले. मात्र सहा महिने हे पाडकाम स्थानिक नागरिकांच्या आक्षेप आणि समस्यांमुळे रेंगाळले. अखेर शनिवारी रात्रीच्या ‘महाब्लाॅक’दरम्यान पूल पूर्णपणे पाडण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर उपनगरी गाड्यांबरोबरच अनेक मेल-एक्सप्रेस धावतात. त्या सर्व वाहतुकीच्या विचार करुन एलफिन्स्टन पूलाचे पाडकाम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले होते. मध्य रेल्वेकडून सर्वात मोठ्या ब्लाॅकसाठी परवानगी रखडली होती. गेल्या आठवड्यात परवानगीचा गुंता सुटला आणि एलफिन्स्टन पूल पाडकामाच्या अंतिम टप्प्याला सुरुवात झाली. याअंतर्गत शनिवारी रात्रभर सीएसएमटी ते दादरदरम्यान संपूर्ण रेल्वे वाहतूक बंद ठेवून पूलाचे पाडकाम केले जाणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एलफिन्स्टन पूल पाडण्यासाठी सीएसएमटी ते दादरदरम्यान शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लोकल वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे रात्री कामावरुन घरी परतणाऱ्या नोकरदारांची रखडपट्टी होणार आहे. तसेच मुंबईत ये-जा करणाऱ्या अनेक मेल-एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक ब्लाॅक काळात बदलण्यात आले आहे. अनेक गाड्या सीएसएमटीऐवजी ठाणे, पनवेल येथून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या गाड्या गाठण्यासाठी प्रवाशांची धावाधाव उडणार आहे. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला आणि आजारी नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
ठाणे ते डोंबिवलीदरम्यान उद्या १० वाजेपर्यंत ब्लाॅक
एलफिन्स्टन पूलाच्या कामाबरोबरच ठाणे आणि डोंबिवली स्थानकांमधील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यात येणार आहे. त्या कामासाठी शनिवारी रात्रीच विशेष ‘ट्रॅफिक पॉवर ब्लॉक’ घेण्यात आला आहे. ठाणे ते डोंबिवलीदरम्यान शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत ब्लाॅक असेल. मुलुंड ते ठाणे (क्रॉसओव्हर्स वगळून) आणि दिवा (क्रॉसओव्हर्स वगळून) ते डोंबिवली (प्लॅटफॉर्मसह) अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर हा ब्लाॅक असणार आहे.
ब्लाॅकचा होणार या लोकल सेवांवर परिणाम
- सीएसएमटी ते दादरदरम्यान शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण लोकलसेवा बंद राहणार.
- ठाणे ते डोंबिवलीदरम्यान लोकल सेवा बंद असेल. तेथील ब्लाॅक काळात काही लोकल दादर किंवा कुर्ला स्थानकांवरुनच चालवल्या जातील.
- शनिवारी रात्री १०.४९ ते १२.३३ वाजता दादरहून सुटणाऱ्या आणि पहाटे ४.४५ वाजता विद्याविहारहून सुटणाऱ्या ते रविवारी सकाळी ९.०५ वाजता सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
- शनिवारी रात्री ११.२६ ते ११.५२ या वेळेत आणि रविवारी पहाटे ३.२३ ते सकाळी ९.५५ या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल कल्याण आणि मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम
ब्लाॅक काळात शनिवारी आणि रविवारच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक आणि स्थानक यात मोठा बदल केला आहे. मध्य रेल्वेने दोन दिवसांतील १५ एक्सप्रेस गाड्यांच्या सेवा सीएसएमटीऐवजी पनवेल आणि ठाणे स्थानकातून चालवण्याचे नियोजन केले आहे. यात तेजस एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, गोरखपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस, अमृतसर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर डाऊन मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.








