शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटल अजिंक्य

---Advertisement---

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटलने रोख पुरस्कारासह अजिंक्यपद पटकाविले. विजयाचे पारडे दोलायमान झालेल्या सामन्यात कप्तान नरेश शिवतरकरने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि जेजे हॉस्पिटलने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा २ विकेटने पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेमध्ये प्रकाश सोळंकीने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा, संदीप कणसे व सुभाष शिवगण यांनी उत्कृष्ट फलंदाजाचे आणि सुदेश यादव व सचिंद्र ठाकूर यांनी उत्कृष्ट गोलंदाजाचे पुरस्कार पटकाविले. विजेत्या-उपविजेत्यांचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी अभिनंदन केले.
आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकादमी सहकार्याने झालेल्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत स्पर्धेमधील अंतिम सामन्यात जेजे हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर प्रदीप क्षीरसागर (१४ चेंडूत १० धावा) लवकर बाद झाल्यावर शंतनू मोरे (२३ चेंडूत २० धावा) व इसाकी मुत्ठू (१४ चेंडूत २५ धावा) यांनी डाव सावरला. परिणामी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ८ बाद १५१ धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यांना दिले. सुभाष शिवगण (२१ धावांत ३ बळी) व अक्षय सावंत (२५ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली.
विजयी धावांचे लक्ष्य साकारण्याच्या हाराकीरीत प्रकाश सोळंकीने( १७ चेंडूत ३३ धावा) एका बाजूने आक्रमक फलंदाजी करूनही जेजे. हॉस्पिटलची नवव्या षटकाला ६ बाद ५७ धावा अशी दयनीय अवस्था रोहन महाडिक (२० धावांत २ बळी) व सुदेश यादव (२१ धावांत २ बळी) यांच्या गोलंदाजीने केली. परंतू आठव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या अर्धशतकवीर अक्षय सावंतने षटकार-चौकारांच्या आतषबाजीने ४१ चेंडूत ६५ धावा फटकावून विजयाचे पारडे जेजे हॉस्पिटलच्या बाजूने झुकविले. कप्तान नरेश शिवतरकरने (३२ चेंडूत नाबाद ३३ धावा) शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून जेजे हॉस्पिटलच्या विजयावर ८ बाद १५५ धावसंख्या रचून शिक्कामोर्तब केला. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात लीलावती हॉस्पिटलने रहेजा हॉस्पिटलचे आव्हान ७ विकेटने संपुष्टात आणताना कप्तान मनोहर पाटेकर (३१ धावा), संदेश पंधेरे ( २८ धावा) व संदीप कणसे (नाबाद २४ धावा) चमकले. नितेश मस्के (३० धावा) व भूषण सावंत (२१ धावा) यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही रहेजा हॉस्पिटलला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment