श्रीरामपूर :येथील रयत शैक्षणिक संकुल श्रीरामपूरच्या वतीने ग्रंथालय व रयत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या, मीनाताई जगधने यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सलग १८ तास वाचन उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय निर्माण होणे, एकाग्रता वाढणे व वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयोग होणार आहे. दि. १० एप्रिल, २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर मध्ये सुरू झालेली असून यामध्ये श्रीरामपूर व परिसरातील विद्यार्थी, वाचक व ग्रंथप्रेमींनी बहुसंख्येने सामील होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी केले आहे. या उपक्रमामध्ये दर २ ते ३ तासांनी मध्यांतर देणे, विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व चहा उपलब्ध करून देणे, वाचन कक्षामध्ये शांत व अभ्यासपूर्ण वातावरण निर्माण करण्याबरोबरच या सर्व नियोजनावर शिक्षकांकडून देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संविधान उद्देशिकेचे वितरण व शपथ, सामाजिक समता या विषयावर कार्यशाळा, निबंध स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन व महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य व प्रवास या विषयावर प्रा. सुभाष वाघमारे, सातारा यांचे व्याख्यान होणार आहे. या उपक्रमामध्ये सर्वांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे,
प्राचार्य डॉ. प्रवीण बडधे, मुख्याध्यापक सुनील साळवे व स्व.सौ. एस. के. सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर व बाल संस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पैठणे यांनी केले आहे.
रयत शैक्षणिक संकुल, श्रीरामपूरमध्ये सलग १८ तास वाचन उपक्रम







