ठाणे – उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याकडे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या योगेश कदम यांच्याकडे ठाणे आणि पालघर या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी “संपर्क मंत्री अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी १२ मंत्र्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. यावेळी योगेश कदम यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली.
मंत्री योगेश कदम यांना देण्यात आलेली जबाबदारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून संघटन विस्तार, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय, इच्छुक उमेदवारांची चाचपणी आणि निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवणे अशा अनेक स्तरांवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव आणि गण पातळीवर शिवसेनेची पकड अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ठाणे आणि कल्याण-डोंबिवली पट्ट्यातील प्रभाव लक्षात घेता, आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक नेतृत्व आणि संघटन यांचा समन्वय साधत मोठी राजकीय मोहीम उभी केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. योगेश कदम यांची नियुक्ती ही त्याच रणनीतीचा भाग मानली जात आहे.
पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, ग्रामपंचायत पातळीवरील कार्यकर्ते आणि बूथस्तरावरील संघटन यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मतदार यादी तपासणी, बूथ व्यवस्थापन, प्रशिक्षण शिबिरे, तसेच संपर्क अभियान अशा कार्यक्रमांनाही वेग दिला जाणार आहे.
एकनाथ शिंदेच्या ठाण्याची धुरा योगेश कदमांकडे;जिल्हा परिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे ‘ॲक्टिव्ह’ मोडवर…







