(सोनई परिसरात तापमानाचा पारा ४२ अंशांवर; उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत)
सोनई – सोनई परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असला तरी यंदाच्या कडाक्याच्या उन्हामुळे या आनंदावर काहीसा विरजण पडल्याचे चित्र दिसून येत आहे. एप्रिलच्या अखेरीस तापमानाचा पारा तब्बल ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांना आणि वऱ्हाडी मंडळींना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. परिणामी, लग्नाचा उत्साह असूनही उष्णतेमुळे सर्वत्र अस्वस्थता जाणवत आहे.
भर दुपारच्या उन्हात प्रवास करून येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची अवस्था विशेषतः बिकट होत आहे. लांबवरून येणाऱ्या पाहुण्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होत असून, अनेकांना थकवा, डोकेदुखी व चक्कर येण्यासारख्या तक्रारी जाणवत आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यांमध्ये उपस्थितीवरही काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येते.मंगल कार्यालयांमध्ये कुलर, पंखे, एसी आणि थंड पाण्याची व्यवस्था केली जात असली तरी वाढत्या तापमानासमोर ही साधने अपुरी पडत आहेत. मंडप,मंगल कार्यालय हॉलमध्ये वाढती गर्दी आणि बाहेरील उष्ण वाऱ्यामुळे कुलरमधूनही गरम हवा येत असल्याच्या तक्रारी पाहुण्यांकडून केल्या जात आहेत. परिणामी, अनेक पाहुणे हॉलमध्ये थांबण्याऐवजी बाहेर झाडांच्या सावलीत किंवा मोकळ्या जागेत आसरा घेताना दिसतात. याचा थेट परिणाम विवाह सोहळ्याच्या व्यवस्थापनावर होत आहे.तसेच नवरदेव मिरवणुकीवर देखील दुपारच्या कडक उन्हामुळे कलवरे मित्र मंडळी वाद्यावर जास्त नाचताना दिसत नाहीत.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता अनेक कुटुंबांनी लग्नाच्या वेळांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक दुपारच्या मुहूर्ताऐवजी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा विवाह उरकण्याकडे कल वाढला आहे. यामुळे पाहुण्यांना दिलासा मिळत असला तरी मर्यादित मुहूर्तांमुळे अनेकांना अजूनही भर दुपारीच विवाह पार पाडावे लागत आहेत.
दरम्यान, उष्णतेमुळे विवाह सोहळ्यांतील खाद्यपदार्थांच्या पसंतीतही बदल झाला आहे. पारंपरिक गरम पदार्थांपेक्षा मठ्ठा, लिंबूपाणी, ताक, फळांचे ज्यूस आणि आईस्क्रीम यांसारख्या थंड पदार्थांना अधिक मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी खास ‘कूलिंग काउंटर’ उभारून पाहुण्यांना थंड पेयांची व्यवस्था करण्यात येत आहे. थंड पेयांना वाढती मागणी कडाक्याच्या उन्हामुळे लग्नसोहळ्यांमध्ये मठ्ठा, लिंबूपाणी, कोकम सरबत, ज्यूस आणि आईस्क्रीम यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी पाहुणे वारंवार या पेयांकडे वळत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी मिनरल वॉटर, थंड पाण्याचे टँकर आणि आईस क्यूब्सची विशेष व्यवस्था केली जात आहे.एकूणच, यंदाच्या उष्णतेच्या लाटेमुळे लग्नसराईचा आनंद काहीसा कमी झाल्याचे चित्र असले तरी योग्य नियोजन, वेळेतील बदल आणि सुविधा वाढवून या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न वधू-वर पक्षाकडून केला जात आहे.
सध्या सोनई परिसरात तर उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून तापमानाने ४२ अंशांचा टप्पा गाठला असल्याने प्रचंड उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः शेतकरी व मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसत असून दुपारच्या वेळेत शेतातील कामे जवळपास ठप्प झाली आहेत. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी अनेक जण सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा काम करण्याचा पर्याय निवडत आहेत.दरम्यान, उन्हाळ्यातील लग्नसराईमुळे नागरिकांचे हाल अधिकच वाढले आहेत.







