सोनई : नुसते पैसे कमवण्यात घातलेले आयुष्य कधीच सार्थकी लागत नाही. सत्ता आणि संपत्ती म्हणजे सर्वस्व नाही हे उमजले की माणूस सुख आणि आनंद शोधतो मात्र तोपर्यंत तो कोसो दूर आलेला असतो. पैशाबरोबर पुण्य आणि पुण्यवान संगत जोडा कारण लौकिक धनापेक्षा पुण्याईचे धन सर्वश्रेष्ठ आहे. ‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण याचा विसर पडू देऊ नये. असे विचार गंगापूर येथील विठ्ठल आश्रमाचे प्रमुख गाथामुर्ती रामभाऊ राऊत बाबा यांनी व्यक्त केले.
निंभारी (ता.नेवासा) येथे आयोजित ६३ व्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह व किर्तन महोत्सवात ते ‘देवा आता ऐसा करी उपकार’ या अभंगावर निरुपण करताना बोलत होते. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, नंदकिशोर महाराज खरात, भगवान महाराज जंगले, आदिनाथ महाराज भोगे, रामनाथ महाराज सुकाळकर, गणेश महाराज आरगडे, माऊली महाराज शिंदे आदी उपस्थित होते. पंचक्रोशीत मोठा इतिहास असलेल्या पारायण सोहळ्याचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले.
निंभारी येथील किर्तन महोत्सवात प्रथमच एका अभंगावर राऊत बाबांनी सलग दोन दिवस कीर्तनाची सेवा देऊन अतिशय समर्पकपणे अभंगावर निरुपण केले. त्यांनी भाव असेल तरच भक्ती होते हे सांगताना विश्वास, प्रेम आणि श्रध्दा बाबत प्रमाण देत पटवून दिले. श्री विठ्ठल संस्थान, संत ज्ञानेश्वर संस्थान, रामकृष्ण आश्रम व तामसवाडी येथील ज्ञानाई गुरुकुलच्या वारकरी विद्यार्थ्यांनी टाळ वादनात विशेष सेवा दिली. वेदांताचार्य म्हस्के महाराज यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता झाली.
पुण्याईचे धन सर्वश्रेष्ठ ठरते; निंभारी किर्तन महोत्सवात राऊत बाबांचे विचार







