शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मंत्री झाल्यानंतरही साधेपणाची परंपरा कायम; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आदर्शवत जीवनप्रवास चर्चेत

---Advertisement---

सरकारी ताफ्यापेक्षा स्वतःच्या वाहनाला प्राधान्य; रेल्वे प्रवासातून दिला सार्वजनिक वाहतुकीच्या वापराचा संदेश

मुंबई : सत्ता, पद आणि प्रतिष्ठा मिळाल्यानंतर जीवनशैलीत मोठे बदल होणे हे आजच्या राजकारणात सामान्य मानले जाते. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतरही आपली साधी राहणी, संयमी स्वभाव आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेले नाते कायम ठेवत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच साधेपणा आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीला महत्त्व दिले. मंत्री झाल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार त्यांना मोठा वाहन ताफा, सुरक्षा व्यवस्था आणि विविध सुविधा उपलब्ध होऊ शकत असतानाही त्यांनी त्याचा अतिरेक टाळण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या ते बहुतांश वेळा स्वतःच्या वाहनातूनच प्रवास करत असून, जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनंतर केवळ एक पायलट कार स्वीकारण्यात आली आहे. यामागे प्रशासनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेला समन्वय हाच हेतू असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यापलीकडे कोणताही अतिरिक्त ताफा किंवा दिखाऊ व्यवस्था न ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे, राज्यातील विविध विकासकामांच्या पाहणीसाठी सातत्याने दौरे करत असताना त्यांनी सार्वजनिक वाहतुकीलाही प्राधान्य दिले आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना ते अनेकदा रेल्वेने प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर व्हावा, इंधन बचत व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागावा, या दृष्टीने त्यांनी स्वतःच्या कृतीतून हा संदेश दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा, असे वेळोवेळी आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रेल्वे प्रवासाला दिलेले प्राधान्य हे केवळ वैयक्तिक निर्णय नसून सामाजिक संदेश मानला जात आहे.सातारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिमा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे, कोणताही दिखावा न करणारे आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित करणारे लोकप्रतिनिधी अशी राहिली आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कोणताही बदल न झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.राजकीय जीवनात अनेक चढ-उतार अनुभवूनही त्यांनी संयम आणि कार्यपद्धतीत सातत्य राखले. मतदारसंघातील विकासकामे, रस्ते प्रकल्प, सार्वजनिक सुविधा, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून त्यांनी लोकाभिमुख नेतृत्वाची छाप निर्माण केली . पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी तसेच प्लॅस्टिकमुक्त प्रशासनाची संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने मंत्रालयातील कार्यालय तसेच शासकीय निवासस्थानांमध्ये एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पाणी बॉटलच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुरवातीलाच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला असून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना त्यांनी दिल्या असून, बैठका, कार्यक्रम तसेच दैनंदिन वापरासाठी स्टील, काचेच्या अथवा पुनर्वापर करता येणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाते.याबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, *“मंत्रीपद हे जनतेच्या सेवेसाठी असते, वैयक्तिक वैभवासाठी नाही. सामान्य नागरिकांच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या सुविधांचा वापर करताना जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. साधेपणा, शिस्त आणि कार्यक्षमतेतून लोकांचा विश्वास संपादन करणे हेच माझे ध्येय आहे. विकासकामांना गती देताना लोकांशी थेट संपर्क कायम ठेवण्यावर माझा भर राहील.”* त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे आणि साध्या जीवनशैलीमुळे सामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांकडून त्यांचे कौतुक व्यक्त केले जात आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही जमिनीशी नाळ कायम ठेवणारे नेतृत्व म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाहिले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment