शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

एस.टी. प्रवासात सवलतीसाठी स्मार्ट कार्डची अट; ज्येष्ठ नागरिकांसमोर ओटीपीचा प्रश्न

---Advertisement---

नेवासा : महाराष्ट्रातील एस.टी. प्रवास आता नव्या डिजिटल टप्प्यात प्रवेश करत आहे. अर्थात एस.टी. महामंडळाने सवलतधारक प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) १ मेपासून विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य होणार आहे. पारदर्शकता वाढवणे आणि रोख व्यवहार कमी करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
महामंडळाच्या मते, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक परतफेड आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही सुविधा एका कार्डमध्ये उपलब्ध होणार आहेत. या योजनेअंतर्गत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकार यांचा समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे कार्ड ‘सरल’ क्रमांकाशी जोडले जाणार असून, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आधार संलग्न कार्ड दिले जाईल. दिव्यांग प्रवाशांसाठी यूडीआयडी क्रमांकाशी जोडलेले विशेष कार्ड उपलब्ध होणार आहे. नवीन कार्डची किंमत १९९ रुपये (जीएसटी सहित) असून, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत मिळणार आहे. किमान १०० रुपयांपासून रिचार्जची सुविधा देण्यात आली असून, बसस्थानकांवरच नोंदणीची सोय असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
मात्र, या डिजिटल बदलासोबत काही व्यावहारिक अडचणीही समोर येत आहेत. विशेषतः कीपॅड (फीचर) फोन वापरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ओटीपी सांगण्यात अडचणी येत असल्याची तक्रार पुढे येत आहे. नोंदणी प्रक्रियेत मोबाईल ओटीपी आवश्यक असल्याने अनेकांना इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रवाशांसोबत तरुण व्यक्ती असणे गरजेचे ठरत आहे. १ मेपासून कार्ड अनिवार्य होणार असल्याने, या अडचणींवर उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment