आ. ओगले, नगराध्यक्ष ससाणे यांनी घेतली पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट
श्रीरामपूर : श्रीरामपूर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. त्यामध्ये खुल्या आम हत्या, अवैध शस्त्र, अमली पदार्थ, संघटित गुन्हेगारी यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून त्याकरिता तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आ. हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी गटनेते मुजफ्फर शेख, सुभाष पोट, निलेश नागले उपस्थित होते.
शहरात कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे. काही विघ्नसंतोषी प्रवृत्ती या सगळ्या प्रकाराला जातीय रंग देऊ पाहत आहे त्यामुळे जातीय सलोखा बिघडला आहे. गेल्या काही दिवसात खुलेआम हत्या, हाणामाऱ्या, अवैध वाळू उपसा, अमली पदार्थ, असे अनेक प्रकार पोलिस प्रशासनाच्या डोळ्यादेखत चालू आहे. त्यात झालेल्या राम- रहीम उत्सवात देखील याचा प्रत्यय आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे श्रीरामपूरची शांतता भंग झाली असून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग देखील भयभीत झाला आहे.
या सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याकरिता उच्चस्तरीय चौकशी करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावर पोलीस महासंचालक सदानंद दाते म्हणाले की, गुन्हेगार कोणीही असो त्याला पोलीस प्रशासन पाठीशी घालणार नाही. आपण दिलेल्या निवेदनाचा सकारात्मक विचार करुन संबंधितांना तसे आदेश देण्यात येईल असे आश्वासित केले.







