श्रीरामपूर : प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना, श्रीरामपूरमध्ये एका आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. येथील रामनवमी यात्रेनिमित्त आलेल्या पाळण्यांमध्ये कर्णबधिर मुलांना मोफत सफारी घडवून आणत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याचे काम राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैय्या बेग आणि भाजपचे तिलक डुंगरवाल यांच्या वतीने करण्यात आले.
दरवर्षी रामनवमीनिमित्त श्रीरामपूरमध्ये मोठी यात्रा भरते. या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या मोठ्या पाळण्यांचा आनंद लुटणे सर्वसामान्य मुलांसाठी सोपे असते, मात्र दिव्यांग मुलांसाठी असे अनुभव अनेकदा दुरापास्त ठरतात. हीच बाब ओळखून सागर भैय्या बेग आणि तिलक डुंगरवाल यांनी पुढाकार घेतला. शहरातील कर्णबधिर विद्यालयातील मुलांना यात्रेचे निमंत्रण देऊन त्यांच्यासाठी सर्व पाळणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
कर्णबधिर मुलांसाठी पाळण्यांचे तिकीट पूर्णपणे माफ करण्यात आले होते.
रामनवमीच्या या पवित्र दिवशी कर्णबधिर मुलांना एकत्र आणत माणुसकीचा संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला प्रत्येक मुलाला आनंदाचा हक्क आहे हा संदेश देत आयोजकांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
पाळण्यात बसल्यावर या मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्यांचा आनंद शब्दातीत होता. “आवाजाच्या दुनियेत नसलो तरी, आनंदाच्या दुनियेत आम्ही कमी नाही,” अशीच भावना त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होती. या उपक्रमाबद्दल पालक आणि शिक्षण क्षेत्रातून सागर भैय्या बेग व तिलक डुंगरवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी यशउत्सवाचे व्यवस्थापक पत्रकार समीर माळवे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अंकुश जेधे, संघर्ष दिघे, रामा पगारे,भोसले,पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते विकास डेंगळे, राहुल रणपिसे, भरत डेंगळे, श्रीधर कराळे, प्रशांत बागुल,तसेच मुख्याध्यापक संतोष जोशी,रामदास रासकर,अतुल साळुंके,दिपक तरकासे,चंद्रकांत सांगळे,कौसल्या जाधव,कैलास बनकर,नंदिनी वक्ते,वंदना उदमले,उज्वला मोरगे,अरुणा तुरुकमारे,मधुकर पवार,मुकिंद गाडेकर,वनिता शिंदे,गोविंद सांगळे आदी राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवक आणि शाळा प्रशासनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
उत्सव म्हणजे केवळ घोषणा आणि गर्दी नव्हे, तर ज्यांच्या आयुष्यात शांतता आहे त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमळवणे हीच खरी रामसेवा आहे. कर्णबधिर मुलांचा आनंद पाहून आमचा रामनवमीचा उत्साह द्विगुणित झाला." - सागर भैय्या बेग (अध्यक्ष, राष्ट्रीय श्रीराम संघ)
समाजात अजूनही कर्णबधिर, दृष्टीहीन, अपंग,मुलांकडे सहानुभूतीने पाहिलं जातं, पण त्यांना खरी गरज आहे ती समजून घेण्याची आणि स्वीकाराची तर ते समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक सक्षमपणे सहभागी होऊ शकतील. " - तिलक डुंगरवार (सामाजिक कार्यकर्ते भाजप)







