श्रीरामपूर : देशभर सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलिंडर तुटवडा, वेळेवर गॅस न मिळणे, पुरवठ्यातील अनियमितता, एजन्सींची मनमानी आणि सर्वसामान्य जनतेची होत असलेली प्रचंड गैरसोय याच्या निषेधार्थ डॉ. गौतम चित्ते यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी, श्रीरामपूर तालुका यांच्यावतीने तहसील कार्यालयासमोर संतापजनक व जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाद्वारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, भाजपची जनविरोधी धोरणे, गॅस पुरवठा व्यवस्थेतील निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला
नागरिकांना वारंवार एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, तरीही वेळेवर गॅस मिळत नाही. या पार्श्वभूमीवर डॉ. गौतम चित्ते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला, युवक, सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान “मोदी सरकार हाय हाय”, “गॅस द्या नाहीतर खुर्ची सोडा”, “जनतेच्या चुलीशी खेळ करणारे सरकार मुर्दाबाद”, “गरीबांच्या स्वयंपाकघराशी खेळ बंद करा” अशा जोरदार घोषणांनी तहसील परिसर अक्षरशः दणाणून गेला.
गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्काळ सुरळीत करा, एजन्सींची चौकशी करा, साठेबाजी आणि काळाबाजार थांबवा, अन्यथा आजचे हे आंदोलन फक्त सुरुवात आहे. यापुढे याहून अधिक तीव्र, व्यापक आणि जनआक्रोश उभा करणारे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देत ठोस मागण्याचे निवेदन शिष्टमंडळाने आंदोलनानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले.
या प्रसंगी युवा जिल्हा महासचिव सुनील वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्ष वैशाली ताई अहिरे, सम्यक जिल्हाध्यक्ष ओम त्रिभुवन तालुका महासचिव ॲड. अण्णासाहेब मोहन, ॲड. अमोल सोनवणे, लीलाबाई त्रिभुवन अश्विनी ताई अहिरे, अकाबाई जाधव, अजय चुनर्रिया आकाश पंडित दीपक पवार, संतोष त्रिभुवन, योगेश घोडके विशाल पठारे राहुल गायकवाड यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गॅस पुरवठा व्यवस्थेतील निष्काळजीपणाच्या निषेधार्थश्रीरामपूर तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन







