- डाॅ.निलेश बनकर पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील जयंत्ती
लोणी : पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले. सहकार, शेती, आरोग्य, शिक्षण आणि अर्थ क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे ते खऱ्या अर्थाने “ग्रामीण विकासाचे शिल्पकार” होते, असे प्रतिपादन यांनी केले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सहकार चळवळीच्या माध्यमातून डॉ. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, साखर कारखान्यांची उभारणी आणि विविध संस्थांच्या स्थापनेमुळे ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळाली. आरोग्य व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी उभारलेल्या संस्थांमुळे सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध झाल्या. त्यांचे नेतृत्व बहुआयामी होते. विखे पाटील परिवाराने नेहमीच राजकीय हितापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत गरजूंना मदतीचा हात दिला. सेवा, ज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांतील त्यांचा वारसा आजही अखंड सुरू आहे.
यावेळी पायरेन्स आय.बी.एम.ए.चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करताना नदीजोड प्रकल्पाबाबत डॉ. विखे पाटील यांची आग्रही भूमिका अधोरेखित केली. देशात काही भागात पूरस्थिती तर काही भागात दुष्काळ अशी विषमता असल्याने नदीजोड प्रकल्पामुळे पाण्याचे समतोल वितरण होऊन शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर तोडगा निघू शकतो, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी पायरेन्स आयबीएमए तसेच डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या प्राचार्या डॉ. कल्पना साठे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती शेलार तर आभार प्रतीक्षा पुलाटे यांनी मानले.







