ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना मिळणार नवे बळ..
लोणी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला २० मे २०२६ पासून प्रारंभ झाला असून, विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला अधिक सुलभ, पारदर्शक आणि आणि विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निक, अत्याधुनिक ऑनलाईन सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी यांनी दिली.
जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेले हे सुविधा केंद्र विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे “ज्ञानद्वार” ठरणार आहे. प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना सक्षम साथ मिळावी, यासाठी येथे आधुनिक तांत्रिक सुविधा, अनुभवी प्राध्यापक, समुपदेशक आणि तांत्रिक सहाय्यकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी, प्रवेश नोंदणी, शाखा निवड, करिअर मार्गदर्शन तसेच विविध शासकीय शिष्यवृत्ती आणि फी सवलत योजनांची माहिती विद्यार्थ्यांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च आणि होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे सुविधा केंद्र आशेचा किरण ठरणार असून, शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ कसा मिळवायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शंका, संभ्रम आणि करिअरविषयक प्रश्नांचे समाधान करण्यासाठी स्वतंत्र समुपदेशन कक्षही सुरू करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या कल, गुणवत्ता आणि भविष्यातील करिअर संधी लक्षात घेऊन योग्य शाखा निवडीसाठी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ प्रवेशच नव्हे, तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळणार आहे.
“तांत्रिक शिक्षण हे ग्रामीण युवकांच्या प्रगतीचे प्रभावी साधन ठरू शकते. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती किंवा संभ्रम न बाळगता आवश्यक कागदपत्रांसह सुविधा केंद्राला भेट द्यावी आणि प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी,” असे आवाहन करण्यात आले आहे.







