केंद्राच्या माध्यमातून १ हजार ४११ महिलांना मिळाली मदत
अहिल्यानगर : महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ तसेच संकटग्रस्त महिलांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सुरू करण्यात आलेले ‘वन स्टॉप सेंटर’ प्रभावीपणे कार्यरत आहे. अनेक पीडित महिलांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या या केंद्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १,४११ महिलांना या सेंटरच्या माध्यमातून विविध प्रकारचे संरक्षण आणि साहाय्य देण्यात आले असल्याची माहिती केंद्राच्या प्रशासक श्रीमती शबाना शेख यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या केंद्रामार्फत पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय मदत, पोलीस साहाय्य, कायदेशीर सल्ला, तज्ज्ञांकडून समुपदेशन, तसेच तात्पुरती निवास व्यवस्था यांचा समावेश आहे.
कौटुंबिक वाद, छळ व मानसिक ताण यांसारख्या समस्यांवर उपाय म्हणून तज्ज्ञ समुपदेशकांकडून योग्य मार्गदर्शन दिले जात असल्याने अनेक महिलांना आत्मविश्वासाने जगण्यासाठी नवी उभारी मिळत आहे.
यासोबतच महिलांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. शाळा, महाविद्यालये व ग्रामीण भागांत विशेष मोहिमा आयोजित करून महिलांना कायदेशीर हक्क, हेल्पलाइन क्रमांक आणि उपलब्ध शासकीय सेवांची माहिती दिली जाते.
संकटात सापडलेल्या महिलांसाठी हे केंद्र अहोरात्र (२४ तास) कार्यरत असून, तातडीच्या परिस्थितीत महिलांनी १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या केंद्रामार्फत महिलांना तात्काळ वैद्यकीय मदत आणि पोलीस साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. तसेच, मोफत कायदेशीर सल्ला देऊन तक्रार नोंदणीस मदत केली जाते. मानसिक ताणातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार व तज्ज्ञांकडून समुपदेशनाची सुविधा दिली जाते. याशिवाय, गरज भासल्यास महिलांसाठी तात्पुरती सुरक्षित निवास व्यवस्था देखील उपलब्ध करून दिली जाते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाला जिल्ह्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.







