मंत्रिमंडळ बैठकीसाठी पायी प्रवास!
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या आवाहनावर चालणं ही आमची नैतिक जबाबदारी: मंत्री नितेश राणे
मुंबई : जागतिक इंधन संकट, वाढती महागाई आणि पर्यावरण संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विभागाला शासकीय सेवेतील इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. या आवाहनाला प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद देत मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज (गुरुवार, १४ मे) रोजी कॅबिनेट बैठकीसाठी मंत्रालयात जाताना शासकीय ताफ्यातील गाड्या बाजूला ठेवून पायी चालत मंत्रालयात एन्ट्री केली. त्यांच्या या कृतीने मंत्रालय परिसरात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेले आवाहन हे प्रत्येक भारतीय नागरिकांच्या हितासाठी आहे. म्हणून त्यांनी केलेल्या अवाहनावर चालणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी स्वीकारत आज मी मंत्रिमंडळ बैठकीसाठी चालत जात आहे. देशाच्या पंतप्रधानांनी नागरिकांना केलेल्या या आवाहनात कोणताही राजकीय मुद्दा नसून पक्षाचे लेबल बाजूला ठेवून एक भारतीय नागरिक म्हणून आपण ह्याकडे पाहिले पाहिजे”, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, “राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करेन की, तुम्ही कोणत्याही पक्षाचे सदस्य होण्याअगोदर तुम्ही एक भारतीय आहात आणि भारतीय म्हणून मोदीजींनी केलेल्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या” असे आवाहन यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केले.







