शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

ई-पिंक रिक्षा योजनेतून जयश्री फाळके यांची आत्मनिर्भरतेकडे भरारी

---Advertisement---

अहिल्यानगर:- केडगाव येथील जयश्री रवींद्र फाळके यांनी महिला व बालविकास विभागाच्या ई-पिंक रिक्षा योजनेचा लाभ घेत स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत. कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्या दिवसा ई-पिंक रिक्षा चालवितात, तर रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करत दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.
या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून त्या पारंपरिक बंधने झुगारून आत्मनिर्भर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. कौटुंबिक अडचणींमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करताना जयश्री फाळके यांनी खंबीरपणे कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीला त्यांनी रात्रीच्या वेळेत सुरक्षारक्षक म्हणून काम सुरू केले. वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन शोधत असताना त्यांना ई-पिंक रिक्षा योजनेची माहिती मिळाली. महिला व बालविकास विभागाच्या साहाय्याने त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आणि अल्पावधीत त्यांना रिक्षा उपलब्ध झाली.
या योजनेअंतर्गत आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक साहाय्य मिळाल्यामुळे त्यांनी आत्मविश्वासाने रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. दिवसा रिक्षा चालविणे आणि रात्री सुरक्षारक्षक म्हणून काम करणे, अशी दुहेरी भूमिका त्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे कुटुंबाचा आर्थिक भार हलका झाला असून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी सक्षमपणे सांभाळली आहे.
शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करत असून ई-पिंक रिक्षा योजना हा त्या प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण भाग ठरत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पाठबळामुळे महिला स्वतःचे उत्पन्न निर्माण करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहेत.
जयश्री फाळके यांची ही वाटचाल केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून ती समाजातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, चिकाटी आणि शासनाच्या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हा सकारात्मक संदेश त्यांच्या कार्यातून मिळत आहे. महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
या योजनेमुळे महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असून त्या स्वतःचा रोजगार निर्माण करत आहेत, असे मत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी व्यक्त केले. जयश्री फाळके यांसारख्या महिलांनी या योजनेचा लाभ घेत आत्मनिर्भरतेकडे यशस्वी वाटचाल केली असून ही बाब अभिमानास्पद असल्याचे कदम यांनी नमूद केले. महिलांनी पारंपरिक चौकटीबाहेर पडून वाहतूक क्षेत्रासारख्या पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही आपले स्थान निर्माण केल्याने समाजाच्या तसेच कुटुंबाच्या विकासात त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment