श्रीरामपूर : श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा दिमाखात पार पडला. प्राथमिक शिक्षणाचा यशस्वी टप्पा पूर्ण करून माध्यमिक विभागात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचे आणि यशाचे कौतुक करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात हस्ते मान्यवरांच्या दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती पूजनाने झाली. प्रास्ताविक अनुजा कुलकर्णी यांनी केले. यावेळी शाळेच्या प्राचार्या दिपाली वगरकर, डीन प्रवीण यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नप्रभा पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रणाली वडतेले आणि दिव्यांन सोनी यांनी पीपीटी सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचे क्षण उलगडले, तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी बहारदार स्वागत नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे मुलांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स. यामध्ये अंशुला बोरुडे हिने गानकोकिळा लता मंगेशकर यांची आणि प्रीत कोठारी याने क्रिकेटपटू विराट कोहली यांची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली. तसेच जतिन सुनील आहुजा याने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासावर आधारित प्रेरणादायी विचार मांडून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
प्राचार्या सौ. दिपाली वगरकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. शेवटी ज्योती कुमावत यांनी आभार मानले.
श्री चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ







