पाच वर्षांपासून न्यायासाठी वनवण
चिचोंडी शिराळ : पतीकडून पोटगीची रक्कम मिळत नसल्याने आणि कोर्टाने जारी केलेल्या वॉरंटची पोलीस अंमलबजावणी करत नसल्याच्या निषेधार्थ, पीडित महिला व तिच्या लहान मुलाने आजपासून (दि. २६) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कायदेशीर आमरण उपोषण सुरू केले आहे. “गेल्या पाच वर्षांपासून न्यायासाठी वनवण फिरत असून, प्रशासनाने दखल न घेतल्यास आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही,” अशी आर्त हाक पीडित महिलेने दिली आहे. रूपाली गोरक्षनाथ डोळे आणि त्यांचा मुलगा शिवम गोरक्षनाथ डोळे (हल्ली रा. चिचोंडी शिराळ, ता. पाथर्डी; मूळ रा. वंजारवाडी, ता. नेवासा) अशी उपोषणास बसलेल्या माय-लेकांची नावे आहेत. तर गोरक्षनाथ आसाराम डोळे असे पतीचे नाव आहे. पीडित रूपाली डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी त्यांचे पती गोरक्षनाथ डोळे यांनी त्यांना व मुलगा शिवम यांना विष प्राशन करून मारण्याचा प्रयत्न केला होता. या कौटुंबिक छळ आणि क्रूरतेनंतर रूपाली डोळे यांनी आपल्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी पाथर्डी येथील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टात अन्न-वस्त्र आणि पोटगी मिळण्यासाठी दावा (क्रि. चौ. नंबर २२/२०२४) दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी होऊन न्यायालयाने रूपाली डोळे व त्यांच्या मुलाला दरमहा पोटगी मंजूर केली आहे. न्यायालयाने पोटगी मंजूर करूनही पती गोरक्षनाथ डोळे कोर्टात हजर राहत नाहीत आणि पोटगीची रक्कमही भरत नाहीत. त्यामुळे मे. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करून ते बजावणीसाठी सोनई पोलीस स्टेशन (ता. नेवासा) येथे पाठवले होते. मात्र, सोनई पोलीस स्टेशनचे संबंधित हेड कॉन्स्टेबल या वॉरंटची कायदेशीर बजावणी करत नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे हताश होऊन अखेर माय-लेकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दार ठोठावले आहे.उन्हातान्हात बसूनही प्रशासन सुस्त; जनतेचा विश्वास उडणार?२६ मे पासून हे उपोषण सुरू झाले असून, कडक उन्हात हे माय-लेक दिवसभर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर न्यायाच्या प्रतीक्षेत बसून होते. मात्र, काल दिवसभरात एकाही जबाबदार शासकीय अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची साधी दखलही घेतली नाही. यामुळे पूर्णपणे निराश झालेल्या रूपाली डोळे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. “सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून, “सरकारने या प्रकरणात तात्काळ योग्य ती कार्यवाही करून न्याय द्यावा,” असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.या गंभीर प्रकरणाकडे आता जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात आणि सोनई पोलिसांना तात्काळ कारवाईचे आदेश देऊन या माय-लेकांना न्याय मिळवून देतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







