श्रीरामपूर : “शत्रू आणि मित्राची खरी ओळख पटणे म्हणजेच जागृतीची सुरुवात होय. समाजात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठी प्रबोधन होणे ही आजच्या काळाची गरज आहे,” असे स्पष्ट मत सत्यशोधक विचारवंत प्रा. सचिन झगडे यांनी व्यक्त केले.
महामानव विचार प्रबोधन समितीच्या वतीने महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. श्रीरामपूर येथील सहर्षा हॉलमध्ये रविवारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रा. झगडे म्हणाले, “जागृतीमुळे माणसाच्या विचारांमध्ये आणि आचरणात बदल घडतो, आणि त्यातून समाजपरिवर्तन शक्य होते. कोणतीही राजकीय क्रांती यशस्वी व्हायची असेल, तर आधी सामाजिक क्रांती घडणे आवश्यक आहे.” त्यांनी पुढे आवाहन केले की, “फुले-आंबेडकरांच्या विचारांचे आपण सुकाणू बनून हे कार्य ‘मिशन’ म्हणून पुढे नेले, तर प्रबोधनाचा दीप कायम प्रज्वलित राहील.”
कार्यक्रमाचे उद्घाटन अपंग सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक प्रा. संजय साळवे यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला बाल व्याख्याती सांची मोहन हिने प्रभावी भाषणातून वातावरण भारावून टाकले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश मकासरे यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेश हिवाळे यांनी केले. शेवटी ऍड. प्रज्ञा बागुल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मानवी मूल्यांसाठी प्रबोधन हाच परिवर्तनाचा मार्ग – सत्यशोधक प्रा. सचिन झगडे







