रखडलेली पाणी योजना तात्काळ सुरू करण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा – डॉ.नीरज लांडे पा.
शेवगाव : शेवगाव शहरात सध्या होत असलेल्या दूषित, दुर्गंधीयुक्त व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. शहरातील अनेक भागांत नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर, गढूळ व घाणीने भरलेले असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी तर नळातून शंख-शिंपले व कचरा येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक भागांमध्ये तब्बल १५ ते १८ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.दरम्यान, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेली महत्त्वाची पाणी योजना काही लोकांनी विनाकारण रखडवून ठेवली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सुरुवातीला ही योजना सुरळीतपणे सुरू होती. काही किरकोळ तांत्रिक बदल सुचविण्यात आले होते. मात्र ते बदल तात्काळ पूर्ण करून योजना सुरू ठेवली असती, तर आजपर्यंत शहराची पाणी योजना पूर्णत्वास गेली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षवेधी ठरत आहेत. “ही योजना गेल्या दहा महिन्यांपासून बंद न पाडता वेळेत पूर्ण झाली असती, तर शेवगावकर माता-भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरला असता. आज पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नसती,” अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. शहराला टँकरवर अवलंबून राहण्याची किंवा तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्याची गरज भासली नसती, असेही त्यांनी सांगितले.एका बाजूला विकासकामांना अडथळे निर्माण होत असताना दुसऱ्या बाजूला नगरपरिषदेकडून निकृष्ट व अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.नागरिकांच्या प्रमुख मागण्या :दूषित पाणीपुरवठ्याची तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावीशहरात स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा त्वरित सुरू करावापाणीपुरवठा नियमित वेळापत्रकानुसार करण्यात यावासंपूर्ण पाईपलाईनची तपासणी करून दोष दूर करावेतरखडलेली पाणी योजना तात्काळ सुरू करून पूर्ण करावीमागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन, मोर्चा तसेच कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी शेवगावकर नागरिक माता-भगिनींच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते डॉ. नीरज लांडे, किरणभाऊ काथवटे व अमोल भाऊ माने यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.







