कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार
सातारा :प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रधानमंत्री आवास योजनेत विक्रमी कामगिरी केली असून, एका वर्षात तब्बल पाच लाख घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना चाव्यांचे वितरण करण्यात आले आहे. पुढील वर्षी आणखी १५ लाख घरांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर आयोजित घरकुल वितरण सोहळ्यात ते बोलत होते. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले , खासदार उदयनराजे भोसले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रियाताई शिंदे उपाध्यक्ष राजू भोसले ग्रामविकास विभागा चे अप्पर सचिव चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २०१६ ते २०२२ या कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याला १२ लाख ९० हजार घरांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्यानंतर नव्याने अनेक गरजू कुटुंबांची नावे समोर आल्याने आणखी ३० लाख घरांची गरज निर्माण झाली. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला असून, पुढील दोन ते तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात घरकुलांचे वितरण होणार आहे.राज्य सरकारकडून प्रत्येक घरकुलासाठी अतिरिक्त ५० हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना सौरऊर्जेसाठी अनुदान देऊन आयुष्यभर मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शेतकरी प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असून केंद्र सरकारच्या सहकार्याने त्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबतही केंद्रीय स्तरावर बैठक घेऊन निर्णय करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचाही निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना फडणवीस म्हणाले, गेल्या दोन वर्षांत राज्यातील ५० लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्यात यश आले असून, हा आकडा एक कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्र्यांना ग्रामविकास योजनेअंतर्गत देण्यात येणारे 9000 कोटी रुपयांचा धनादेश यावेळी प्रदान केला .भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने व ग्रामविकास विभागाच्या वतीने व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली .तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रामविकास यंत्रणेने महत्त्वाकांक्षी राबवलेल्या प्रकल्पांची माहिती पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आलेपालकमंत्री शंभूराज देसाई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीने रवानाजिल्हा परिषदेच्या सदस्य निवडी वेळी महायुतीचे घटक पक्ष असणारे भाजप व शिवसेना यांच्यात राजकीय रणकंदन माजले होते या रणकंदनाचा कोणताही प्रतिकूल परिणाम घरकुल सोहळ्याच्या कार्यक्रमावर जाणवला नाही .शिष्टाचाराला अनुसरून पालकमंत्री शंभूराज देसाई हे सातारा सैनिक स्कूलच्या हेलीपॅड वर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोहोचले .तसेच व्यासपीठावर सुद्धा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री शंभूराजे हे आमने-सामने आले त्यांनी एकमेकांना सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने अनौपचारिक भेट घेऊन पुष्पगुच्छ दिले .महायुतीचे जिल्ह्यातील धुरंदर घरकुल सोहळ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर यावेळी पाहायला मिळाले .शिवेंद्रसिंह राजे मुख्यमंत्री पालकमंत्री शंभूराज देसाई एकाच गाडीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा अनावरण कार्यक्रमाला एकत्र पोहोचल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले .सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा यशवंत एकजिनसीपणा यावेळी प्रकर्षाने दिसून आला .धुरंधर जया भाऊंची कार्यक्रमावर पकडग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हा सातारा जिल्ह्यातील भाजपचा ग्रामीण चेहरा आणि तोही आक्रमक रणनीतीचा चेहरा म्हणून सातत्याने पुढे आले आहेत मानखटासारख्या दुष्काळी भागात विरोधी पक्षाला सातत्याने विशेषता राष्ट्रवादीला बॅकफूटवर ठेवण्यात जयकुमार गोरे यशस्वी झाले आहेत .ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांची राजकीय वाटचाल उत्तरोत्तर प्रगल्भ होत असून राजकीय मुरब्बीपणा त्यांच्या वागण्यात जाणवू लागला आहे .या कार्यक्रम सोहळ्यात सुद्धा तो मुरब्बीपणा पदोपदी जाणवला कार्यक्रमाचे नेटके आणि काटकसरीचे संयोजन करून घरकुलांचा मास्टर स्ट्रोक लगावण्यात आणि भाजपची जिल्ह्यात मजबूत पकड निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जे यश आले आहे त्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे यशस्वी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे .







