श्रीरामपूर : “जनगणना हे केवळ आकडेवारीचे संकलन नसून ते देशाच्या भावी नियोजनाचा पाया असणारे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी तांत्रिक सूक्ष्मता समजून घेऊन अत्यंत अचूक माहिती संकलित करावी,” असे प्रतिपादन भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे जनगणना निरीक्षक श्रीकांत बनकर यांनी येथे केले.
श्रीरामपूर येथील सी. डी. जैन महाविद्यालयात आयोजित जनगणना प्रशिक्षण वर्गाला बनकर यांनी भेट दिली, त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या तांत्रिक अडचणी जाणून घेतल्या व त्यावरील शंकांचे निरसन केले. त्यांच्या या भेटीमुळे स्थानिक महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले असून कामाला मोठी प्रशासकीय गती प्राप्त झाली आहे.
या प्रशिक्षण वर्गाचे खास आकर्षण ठरले ते उंडे वस्ती शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक अनंत गोरे यांनी तयार केलेले ‘जनगणना जनजागृती व्हिडिओ गेम’. जनगणनेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गोरे यांनी एका विशेष प्रश्नमंजुषा गेमची निर्मिती केली आहे. याचे सादरीकरण प्रशिक्षण वर्गात करण्यात आले. बनकर यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक करून गोरे यांचा सत्कार केला.
हे प्रशिक्षण शिबिर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहाय्यक महसूल अधिकारी निलेश इंगळे, मास्टर ट्रेनर गणेश पिंगळे, योगेश राणे, निलेश राजवाळ, सचिनकुमार शिंदे, तंत्र सहाय्यक राजेश कवाने, नवनाथ कैतके, प्रसिद्धी विभाग प्रमुख शुभम पवार व संदीप पाळंदे यांनी नियोजन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक नेते विजय काटकर यांनी श्रीकांत बनकर यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करून उपस्थितांचे आभार मानले. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या वर्गामुळे तालुक्यातील जनगणनेच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
जनगणनेचे काम राष्ट्रीय कर्तव्य; अचूकतेवर भर द्या : केंद्रीय निरीक्षक बनकर







