लोणी: निमगाव जाळी येथे नुकताच एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी ‘परिवर्तनवादी’ विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती म्हणजे नववधूची लग्नमंडपातील एन्ट्री. हातात भारतीय संविधानाची उद्देशिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन, घोड्यावर स्वार होऊन वधूने मंडपात प्रवेश केला. या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकून घेतली असून परिसरात या लग्नाची मोठी चर्चा होत आहे.
विश्वदीप वाघमारे आणि विदिशा मुन्तोडे या नवदाम्पत्याचा हा विवाह सोहळा संविधानाच्या साक्षिने पार पडला. वर विश्वदीप हे कोंची येथील नालंदा बौद्ध आश्रमाचे प्रमुख धर्मगुरू महाबोधी करुणानंद बोधी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत, तर वधू विदिशा ही शिबलापूर येथील दिवंगत रवींद्र राजू मुन्तोडे यांची कन्या आहे. या सोहळ्याला राजकीय, धार्मिक, शासकीय सेवेतील आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ परंपरांना फाटा न देता, त्यामध्ये आधुनिक आणि वैचारिक मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाच विविध धर्मातील धर्मगुरूंच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. नववधू विदिशा हिने घोड्यावर बसून हातात संविधान घेऊन प्रवेश करणे, हे स्त्री शक्तीचे आणि घटनात्मक हक्कांचे प्रतीक मानले जात आहे.
याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधानामुळेच आज महिलांना समाजात सन्मानाने जगण्याचा आणि आपले हक्क बजावण्याचा अधिकार मिळाला आहे, असे सूर सर्वच भाषणांतून उमटले. महिलांचा गौरव व्हावा आणि समाजात एक आदर्श निर्माण व्हावा, या उद्देशाने या ‘आदर्श बौद्ध’ विवाह पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
या ऐतिहासिक सोहळ्याला ॲड. किरण रोहम, परिमल निकम, रमणलाल शिंगवी, अर्चना राम गायकवाड, चरण त्रिभुवन, शिवाभाऊ साठे, प्रदीप थोरात, नाथा आल्हाट, संदीप खरात, विनोद गायकवाड, रमेश रूपवते, फिरोजशहा पठाण, बंटी यादव, सचिन साळवे यांसह अनेक मान्यवर आणि सजग जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. या परिवर्तनवादी विवाहाने समाजासमोर एक नवा आणि पुरोगामी आदर्श ठेवला आहे.
हातात संविधान घेऊन घोड्यावर बसून वधूची लग्नमंडपात एन्ट्री; निमगाव जाळीत ‘परिवर्तनवादी’ विवाह सोहळा उत्साहात संपन्न







