सोलापूर : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जनगणना २०२७ संदर्भात माहिती देत सांगितले की, ही भारताची १६ वी व स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असून ती पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे. आजपासून ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-जनगणना (Self Enumeration) सुरू होत आहे. ही प्रक्रिया केवळ लोकसंख्येची नोंद नसून देशाच्या भविष्यातील विकासाचे मापदंड ठरविण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात कृषी क्षेत्रात सन २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ४ लाख ८६ हजार लाभार्थ्यांना ९७ कोटी ३९ लाख रुपये थेट खात्यात जमा झाले आहेत. आगामी खरीप हंगामासाठी खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत मंजूर ७८३ कोटी निधीचा शंभर टक्के वापर करण्यात आला असून २०२६-२७ साठी ८४२ कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.सोलापूरसाठी विमानसेवा सुरू होणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरले असून सध्या मुंबई व गोवा येथे सेवा सुरू आहे. लवकरच तिरुपती, हैदराबाद व पुणे या शहरांसाठीही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन आयटी पार्क उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सोलापूर शहरासाठी १३७८ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे नियमित व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर कॉरिडॉर उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. मंगळवेढा येथे जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराज स्मारकासाठी १५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज स्मारकासाठी १५० कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यापैकी १०० कोटी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.या मंगलदिनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०५ हुतात्म्यांना तसेच महाराष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींना पालकमंत्री गोरे यांनी अभिवादन केले. तसेच उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत व वंदे मातरम सादर करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. परेड कमांडर विशाल नवले यांच्या नेतृत्वाखाली परेडचे निरीक्षण व पथसंचलन पार पडले.यावेळी पोलीस महासंचालक पदक विजेते अधिकारी-कर्मचारी तसेच क्रीडा, महिला व बालविकास आणि इतर विभागांतील गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्व-जनगणनेत सहभाग घेऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -पालकमंत्री जयकुमार गोरे







