संगमनेर तालुका टंचाई आढावा बैठक संपन्न
तालुक्यातील ओढे नाले अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम राबवा!
संगमनेर – प्रतिनिधी ग्रामीण भागातील पाणी टंचाईचे गांभीर्य लक्षात घेवून टॅकरचे योग्य नियोजन करून पाणी टंचाईच्या समस्येला सर्वोच्च प्रधान्य द्यावे.टॅकरचे वेळापत्रक वीज वितरण कंपनी आणि पंचायत समितीने तयार करून जनतेसाठी खुले करावे.जलजीवन योजनेच्या कामात झालेल्या हलगर्जीपणाची स्वतंत्र चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.संगमनेर येथे तालुकास्तरीय पाणीटंचाई व चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे उपस्थित होते. यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व विविध शासकीय विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, सध्या तालुक्यात १९ टँकरांद्वारे २५ गावे व ५४ वाड्यांमधील नागरिकांना पाणीपुरवठा सुरू असून हे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे. टँकर्सचे वेळापत्रक तयार करून गावकऱ्यांना आगाऊ माहिती द्यावी. टँकर गावात पोहोचल्यावर ग्रामसेवक व तलाठी यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने टँकरचे पाणी थेट विहिरीत न सोडता लोकसंख्येनुसार पाचशे किंवा हजार लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये सोडावे व त्यांना तोटी बसवून पाण्याचे वितरण करावे, पाण्याचा उद्भव जिथे आहे तिथेच जल शुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीत झाला असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या प्रदूषित पाण्याकडे संबंधित गावाच्या तलाठी ग्रामसेवक यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या.जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे केलेले दुर्लक्षाबद्द्ल नाराजी व्यक्त भंडारादारा ते ओझर बंधारा पर्यत कालवा म्हणून नोंद असल्याने तातडीने मोजणी करावी तसेच तालुक्यातील सर्व ओढे नाले अतिक्रमण मुक्त करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याचे शंभर टक्के नमुने तपासून त्यांची नोंद ठेवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.टंचाईच्या काळात पिण्याचे पाणी सुरळीत ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे नागरिकांना पाणी न मिळणे ही बाब खपवून घेतली जाणार नाही. रोहित्रांवरील विजेचा भार वाढून वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी अनधिकृत वीजजोडण्या तोडण्याची मोहीम हाती घ्यावी. दूध उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पाणी उपशाच्या मोटारी सुरू करण्याबाबत वेळेचे योग्य नियोजन करावे. वादळामुळे पडलेले विजेचे खांब उभारण्याचे काम इतर भागातील मनुष्यबळ वळवून तत्काळ पूर्ण करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे विनाविलंब पूर्ण करावीत. कामे परस्पर उपकंत्राटदारांना देणाऱ्या मुख्य ठेकेदारांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी. अनधिकृत जलवाहिन्यांद्वारे होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी दंडात्मक पावले उचलावीत. जलजीवन मिशनमधील गैरव्यवहार व त्रुटी दूर करण्यासाठी स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत नसतानाही केवळ जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत तेथील त्रुटींबाबत नागरिकांनी किमान पन्नास सह्यांचे निवेदन लोकप्रतिनिधींकडे जमा करावे. तळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी निळवंडे धरणातून आलेली पाईप लाईन पुढे नेणे हाच पर्याय असल्याने त्याचे सर्व्हेक्षण करावे.घुलेवाडी गावाच्या पाणी प्रश्नाबाबत मंत्री विखे सविस्तर माहीती जाणून घेतली.अनेक वर्षे इथली योजना मार्गी लागत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदारांनी सुध्दा दुसर्याला काम दिले अधिकारी सुध्दा ठेकेदाराचे नाव सांगायला घाबरत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.पाणीटंचाईच्या काळात ग्रामसेवकांनी मुख्यालयात थांबून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा. बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यात कसूर करणाऱ्या व केवळ कागदोपत्री काम करणाऱ्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ विकासावर लक्ष केंद्रित करावे. जनतेला प्रशासनाचा आधार वाटला पाहिजे व यासाठी प्रलंबित प्रश्नांवर सनदशीर मार्गाने आवाज उठवून शासकीय यंत्रणेला गती द्यावी, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी केले.आमदार अमोल खताळ यांनी वीज वितरण कंपनी तसेच तालुक्यातील प्रशासकीय स्तरावरचे प्रश्न प्रास्ताविकात उपस्थित केले.







