महात्मा फुले कृषि विद्यापीठात शेतकरी- उद्योजक- शास्त्रज्ञ मंच संवादाचे आयोजन भरडधान्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीसाठी संशोधनाची गरज – कुलगुरू डॉ. विलास खर्चे
राहुरी विद्यापीठशेतातील उत्पादन वाढवताना हवामानात होणारे बदल, निविष्ठांच्या वाढलेल्या किमती यामुळे मर्यादा येतात. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी शेतातील उत्पादनावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास उत्पन्न वाढेल. यामध्ये प्रक्रियेला मोठे महत्त्व असून सेकंडरी एग्रीकल्चरची गरज निर्माण झाली आहे. भरडधान्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले यांच्या द्विवार्षिक जन्मशताब्दीनिमित्त तसेच जागतिक भरडधान्य अभियानाच्या निमित्ताने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, आत्मा, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत असलेल्या पौष्टिक तृणधान्य विकास प्रकल्पांतर्गत भरडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख तथा प्रकल्पाचे सहप्रमुख अन्वेषक डॉ. विक्रम कड, अहिल्यानगर येथील आत्माचे प्रकल्प संचालक श्री. प्रदीप लाटे, प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक तथा कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, शेतकरी- उद्योजक – शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष श्री. सतीश राऊत व सौ. मंजुळा देशमुख उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेश्मा जाधव व प्रतीक्षा पुराणिक यांनी तर आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले. यावेळी प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. सुरेश दोडके, डॉ. प्रकाश लोखंडे, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 110 पेक्षा जास्त संख्येने प्रक्रिया उद्योजक, विविध बचत गटांचे सदस्य, शेतकरी व महिला शेतकरी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.





