जुनी व नूतन विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने दानपेट्या उघडून रोख रक्कम मोजली; पुन्हा पेट्या सीलबंद
नेवासा : नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री. व्यंकटेश उर्फ बालाजी देवस्थान ट्रस्टच्या दानपेट्यांतील दान रकमेची मोजदाद व यात्रा नियोजनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पडली. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे लेखापरीक्षक निरीक्षक यू. एम. ढोले यांच्या निरीक्षणाखाली दानपेट्यांतील रोख रक्कम काढून तिची मोजदाद करण्यात आली. त्यानंतर सर्व दानपेट्या पुन्हा सीलबंद करण्यात आल्या.
या प्रक्रियेदरम्यान देवस्थानच्या जुन्या बॉडीचे पदाधिकारी, नूतन बॉडीचे पदाधिकारी तसेच विश्वस्त यांनी सहकार्य केले. दानपेट्यांतील रकमेची मोजदाद आणि यात्रा नियोजनाच्या कामकाजात संबंधितांनी सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले.
देवस्थानच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दानपेट्यांतील रकमेची मोजदाद आणि पुढील नियोजनाच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.
यावेळी देवस्थानचे संबंधित पदाधिकारी, विश्वस्त व कर्मचारी उपस्थित होते.





