शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

जरांगेच्या आरोपावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदेश

---Advertisement---


आरोप-प्रत्यारोप थांबवा, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला जा!

  • शिवसैनिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना
    वाद थांबण्याचे आवाहन

    मुंबईः मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ध्वनिफीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु झालेले असतानाच आता हा वाद थांबविण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एकमेकांवर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबवून थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा असे आदेश शिंदे यांनी स्वपक्षीय मंत्री, आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
    मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ध्वनिफितीवरुन गेल्या दोन दिवसांपासून महायुती सरकारमधील भाजप- शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. व्हायरल झालेल्या ध्वनिफितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्याचा दावा करीत शिवसेनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपाकडून ५०० कोटी रुपये घेतल्याच्या कथित दाव्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची शिवसेना शिष्टमंडळाला ग्वाही देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही या ध्वनिफितीवरुन शिवेसना आणि भाजपच्या आमदारांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. या वादावर गेल्या दोन दिवसात भाष्य करण्याचे टाळलेल्या उपमुख्मयंत्री शिंदे यांनी आज एका आदेशान्वये आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना गप्प बसण्यास सांगितले आहे. व्हायरल वादग्रस्त ध्वनिफितीनंतर एकमेकांवर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबवून थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला जा असे आदेश शिंदे यांनी स्वपक्षीय मंत्री, आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ध्वनिफितीनंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची अहमअहमिका सुरू झाली होती, आता ही कटुता टाळून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना शिंदे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. दुष्काळ गंभीर आधी शेतकऱ्यांना आधार द्या – शिंदे
    राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून अशा कठीण काळात शेतकऱ्याला आधार देणे हे शिवसेनेचे प्रथम कर्तव्य आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागांसाठी साडेतीन लाख धान्याची किट पाठवण्यात आली होती. ही मदत त्या त्या भागात पोहोचली असून ती थेट गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहचवणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य आहे. यासोबतच राज्य सरकारकडून जाहीर होणारी मदत प्रत्यक्षात प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचते की नाही, याची कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी असेही शिंदे यांनी सांगितले आहे. शासकीय मदतीसाठी लागणारे अर्ज भरण्यापासून ते पंचनाम्यांच्या प्रक्रियेपर्यंत सर्व प्रशासकीय कामांत शिवसैनिकांनी शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले आहे.पक्षाच्या दसरा मेळाव्यातील भाषणात शिंदे यांनी यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, असा शब्द राज्यातील जनतेला दिला होता. हा शब्द पाळण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहनही केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

Leave a Comment