धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्याचे धोरण जलसंपदा विभागाने घेतले आहे. कोकणात वाहून जाणारे पाणी नासिक अहील्यानगर आणि जायकवाडी मध्ये वळवून गोदावरीचे खोरे कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहीती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था आणि पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाघाड धरण जलपूजन सोहळा व प्रकल्पस्तरीय पाणी वाटप संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या मेळाव्यात ते बोलत होते. दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाउली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, दिंडोरीच्या नगराध्यक्ष आशा कराटे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, नांदूर मध्यमेश्वरचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवले, वैभव भागवत, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी सुनील पाटील, उपअभियंता संभाजी पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
मंत्री डॉ. विखे-पाटील म्हणाले की, नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रगण्य असून येथील शेतकरी प्रगतिशील आणि प्रयोगशील आहेत. फळबागा, विविध कृषी प्रयोग आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतीच्या विकासासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि पाणी वापर संस्थांची प्रभावी भूमिका महत्त्वाची आहे. वाघाड प्रकल्पातील पाणी वापर संस्थेने केलेले काम उल्लेखनीय असून संस्थेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी पदाधिकारी व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, वाघाड धरणातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी. धरणातील पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, तसेच धरणाच्या विकासासाठी कृती समिती स्थापन करावी. खासदार श्री. भगरे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता श्री.राजेश गोवर्धन यांनी करून विविध प्रकल्पांची माहिती दिली.





