मुंबई – पत्रकारांच्या संरक्षणासाठी …मी राहणार आहे पत्रकारांच्या पाठी असे सांगत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांवर होणारे अन्याय, पत्रकारांवर होणारे हल्ले हे रोखले पाहिजेत.पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आहे. काही राज्यात पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे. देशातील सर्वच राज्यात पत्रकार संरक्षण कायदा करण्याची गरज आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
जयपूर येथील पिंक सिटी प्रेस क्लबच्या 35 व्या वर्धापनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री श्रीमती दीयाकुमारी तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार मदन राठोड, आमदार गोपाळ शर्मा, अध्यक्षस्थानी पिंक सिटी प्रेस क्लबचे अध्यक्ष मुकेश वीणा, महासचिव राजकुमार शर्मा आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
मी सुध्दा भुमिका नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र चालविले आहे. मी पत्रकार म्हणून काम केलेले आहे. पत्रकारीतेचा मला अनुभव आहे. परंतु मी कायमस्वरुपी पत्रकारिता केली नाही. मी समाजकारणात आणि राजकारणात पूर्ण वेळ दिला. पत्रकार हे नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. अनेक वृत्तवाहिन्यांनी माझी भाषणे, माझ्या शिघ्र कविता दाखविल्या. अनेक वर्तमानपत्रांनी माझे भाषणे, माझे मोर्चे, माझ्या कार्यक्रमाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत. पत्रकारांमुळे माझे नेतृत्व उभे राहिले. पत्रकारांवर होणारे हल्ले हे रोखले पाहिजे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. लोकशाहीच्या मजबुतीसाठी पत्रकार हा प्रमुख घटक आहे. पत्रकारांनी छापलेल्या बातम्या त्यातुन दुखावणारे लोक पत्रकारांवर हल्ले करतात. पत्रकारांच्या विचाराला विचाराने उत्तर दिले पाहिजे. प्रत्यक्ष हल्ला करणे चुकीचे आहे. त्यामुळे पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी पत्रकार संरक्षण कायदा केलाच पाहिजे. यासाठी मी आग्रही असुन आपण संपुर्ण देशात पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे ना. रामदास आठवले म्हणाले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष राधामोहन सैनी, राष्ट्रीय सचिव प्रतिमा तोतला, नवरतन गुसाईवाल;अमरवीर सिंह, आदि आनेक मान्यंवर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवर पत्रकारांना केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले. पिंक सिटी प्रेस क्लबची स्थापना 1992 मध्ये प्रविणचंद धावडा यांनी केली होती.





