आंबी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी आदिती सचिन मेहेत्रे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात आदितीने ८८.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशाबाबत बोलताना आदितीने सांगितले की, “अभ्यासातील सातत्य, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मी हे यश संपादन करू शकले. मला शाळेतील मुख्याध्यापक श्री. काळे सर, माझे मार्गदर्शक वर्गशिक्षक अण्णासाहेब आरंगळे व इतर सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.”केवळ शालेय शिक्षणच नव्हे, तर घरी देखील आई-वडिलांनी अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करून दिले. पालकांच्या पाठिंब्यामुळेच मी कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षेला सामोरे जाऊ शकले, अशा शब्दांत आदितीने आपल्या भावना व्यक्त केल्या. आदितीच्या या घवघवीत यशामुळे मेहेत्रे परिवारासह संपूर्ण विद्यालयाचे नाव पंचक्रोशीत उज्ज्वल झाले आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वृंद आणि बेलापूर व केसापूर ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
केशव गोविंद विद्यालयात आदिती मेहेत्रे प्रथम







