श्रीरामपूरच्या ‘देवदूत’ लघुपटाने मारलं पुण्याचं मैदान; गणेश बिरदवडे यांच्या दिग्दर्शनाची मोहोर
श्रीरामपूर: ग्रामीण भागातील कलागुणांना योग्य वाव मिळाल्यास ते जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवू शकतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. श्रीरामपूरच्या मातीत तयार झालेला व येथील दिग्दर्शक गणेश बिरदवडे यांच्या ‘देवदूत’ या लघुपटाने पुणे येथे संपन्न झालेल्या ‘द बुद्धा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२६’ मध्ये बाजी मारली आहे. या लघुपटाने महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म’ म्हणून प्रथम पारितोषिक पटकावत श्रीरामपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
पुणे येथील या प्रतिष्ठित महोत्सवात देशभरातून अनेक लघुपट सादर करण्यात आले होते. मात्र, आशयघन मांडणी आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे ‘देवदूत’ने परीक्षकांसह प्रेक्षकांचीही मने जिंकली. या लघुपटाची निर्मिती आशादेवी किशोर जाधव व गणेश बिरदवडे यांची असून, रवी जावरे यांच्या छायाचित्रणाने कथेला वेगळी उंची मिळवून दिली आहे.
लघुपटात संगीता वाघमारे, अस्मिता मोरे, गोरख गायकवाड आणि दीपक गोर्डे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ग्रामीण भागातील मर्यादित संसाधने असतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर बिरदवडे आणि त्यांच्या टीमने ही कलाकृती साकारली. कथेतील जिवंतपणा आणि कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे ही फिल्म महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली.
या यशाबद्दल प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, ग्राम महसूल अधिकारी राजेश घोरपडे, आकाश करपे यांसह तालुक्यातील विविध क्षेत्रांतून गणेश बिरदवडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही यशोगाथा ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांसाठी मोठी प्रेरणा ठरणारी आहे.







