नागरिकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ
लोणी : ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना वेळेअभावी, आर्थिक अडचणीमुळे किंवा शहरातील रुग्णालयांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणींमुळे वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन गावपातळीवरच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने चिंचपूर, येथे पायरेन्स डॉ.विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि चिंचपूर सेवा संस्था तसेच जनसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत स्त्रीरोग व बालरोग आरोग्य शिबिरास ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिला व बालकांच्या आरोग्य समस्यांकडे गांभीर्याने पाहत स्त्रीरोग व बालरोग विभागासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. जनसामान्याच्या हितासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रवरासमूहाचे कार्य सर्वश्रुत आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुप्रिया ढोकणे पाटील, पायरेन्सचे सचिव आणि संचालक डाॅ.निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरजवंतांच्या सेवेसाठी पायरेन्सतर्फे विविध प्रकारच्या आरोग्य विषयक मोफत शिबिरांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून मौजे चिंचपूर येथे मोफत स्त्रीरोग व बालरोग आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरात बालरोग तज्ञ डॉ. योगेश निघुते यांनी बालकांची सखोल तपासणी करून पालकांना बालसंगोपन, पोषण आहार, लसीकरण, ऋतूनुसार काळजी व बालआरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. स्त्रीरोग तज्ञ डॉ. अमृता घुगरकर यांनी महिलांच्या विविध आरोग्य समस्यांची तपासणी करून योग्य उपचार व सल्ला दिला व आवश्यक ते मार्गदर्शन केले. शिबिरात रक्तदाब, वजन, सर्वसाधारण तपासणी, महिलांसाठी विशेष आरोग्य सल्ला, बालकांची तपासणी, औषध वितरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना यांसारख्या विविध सेवा देण्यात आल्या. अनेक महिलांनी आपल्या आरोग्य समस्या मोकळेपणाने मांडत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले. पालकांनी बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक कैलास नाना तांबे, सोसायटीचे चेअरमन शत्रुघ्न तांबे,गीताराम पाटील तांबे, प्रवरा बँकेचे संचालक हौशीराम तांबे, शंकर तांबे, बाबासाहेब पारधे, गीताराम पवार, गजाबा तांबे, नामदेव तांबे आदी उपस्थित होते.







