नेवासा : नेवासा तालुक्यातील माका येथे शृंगऋषिगडाचे महंत सुरेशानंद महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली माका ग्रामस्थांच्या सौजन्याने दिनांक २४ एप्रिल पासून सुरुवात होत असून ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या शृंगऋषिगडाचा दुसऱ्या नारळी सप्ताहास विविध धार्मिक उपक्रमांनी आणि मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण माका परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तिभावाने दुमदुमून गेला आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शृंगऋषि व विविध महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर विधिवत घटस्थापना आणि वीणा पूजन करून सप्ताहाचा शुभारंभ पुष्पवृष्टी करून प्रारंभ झाला. यावेळी परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सप्ताहाच्या निमित्ताने २४ तास अखंड वीणा पहारा आणि विठ्ठलनामाचा जप सुरू आहे. दररोज सकाळी व सायंकाळी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत, ज्यातून अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा जागर होत आहे. दररोज दुपारी ह भ प गणेश महाराज वारंगे यांचे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्ञानेश्वर महाराज तांबे उमेश महाराज दशरथे, राम महाराज झिंजुर्के, बद्रीनाथ महाराज नवल, अनिल महाराज पाटील यांची कीर्तन रुपी सेवा पार पडली असून भगवान महाराज शास्त्री,ज्ञानेश्वर महाराज जळकेकर,स्वामी जनार्दन महाराज,अक्रूर महाराज साखरे,लक्ष्मण महाराज शास्त्री, गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री,रोहिदास महाराज शास्त्री, विशाल महाराज खोले यांचे कीर्तन महोत्सव पार पडणार आहेत. येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची सकाळ व सायंकाळी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. माका ग्रामस्थांनी या सप्ताहासाठी विशेष परिश्रम घेतले असून, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. हा सप्ताह केवळ धार्मिक कार्यक्रम नसून परिसरातील एकता आणि संस्कृती जोपासण्याचा एक सोहळा आहे. अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. शृंगऋषिगडाचा हा २ रा नारळी सप्ताह भक्तिभावाचा नवा आदर्श निर्माण करत असून, भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा. सप्ताहाची सांगता १ मे रोजी महंत गुरुवर्य सुरेशानंद महाराज शास्त्री यांच्या भव्य काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने होणार आहे. या धार्मिक उत्सवामुळे माका पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शृंगऋषिगडाचा २ रा नारळी सप्ताह उत्साहात सुरू; माका परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला







