लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक बाळासाहेब रामनाथ गाडेकर यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान करण्यात आला. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
शिर्डी येथील साईयोग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. योग शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गुणवंत विद्यार्थी सन्मान अशा अनेक उपक्रमांमध्ये प्रा. गाडेकर यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, रक्तदान शिबिर, ग्रामस्वच्छता आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रमांमध्येही त्यांनी गेल्या २४ वर्षांपासून उल्लेखनीय योगदान दिले आहे.
प्रा. गाडेकर हे त्यांचे वडील कै. रामातात्या गाडेकर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
या यशाबद्दल जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे तसेच उपप्राचार्य डॉ. दिपक घोलप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
विखे पाटील महाविद्यालयांचे प्रा. बाळासाहेब गाडेकर यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार







