शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

जैन धर्म स्वतंत्र, प्राचीन व अनादि – अल्पसंख्यांक दर्जा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : संदीप भंडारी

---Advertisement---


पुणे : सिंहगड रोड — जैन धर्म हा अनादि काळापासून अस्तित्वात असलेला स्वतंत्र, प्राचीन व वैभवशाली धर्म आहे. तो कोणत्याही इतर धर्माची शाखा नसून, जैन समाजाने अल्पसंख्यांक दर्जा सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ठाम प्रतिपादन अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केले.
अक्षय तृतीया या पवित्र व शुभ मुहूर्तावर अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या सिंहगड रोड (पुणे) शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हा सोहळा पूज्य आचार्य विराग सागर जी महाराज यांच्या पावन सानिध्यात अत्यंत भव्य, आध्यात्मिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
संदीप भंडारी यांनी पुढे सांगितले की, राज्य व केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना जैन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महासंघ सातत्याने कार्यरत आहे. सिंहगड रोड शाखाही या कार्यात प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी पूज्य आचार्य विराग सागर जी महाराज यांनी जैन धर्माचे तत्त्वज्ञान, समृद्ध इतिहास व आध्यात्मिक परंपरेचे महत्त्व स्पष्ट करताना युवकांना पंथ व संप्रदायातील भेद विसरून जैन समाजाच्या एकता, संघटन व सशक्तीकरणासाठी कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात भरत भुरट व सुहास शाह यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांच्या हस्ते शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
जैन समाजाच्या संघटनाला बळकटी देण्यासाठी सिंहगड रोड शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून श्री विक्रम ओसवाल यांची शाखाध्यक्षपदी तर श्री विक्रम बागरेचा यांची शाखा महामंत्रीपदी तसेच आशिष गुंदेचा, महावीर बिनाकिया, जयेश लुंकड, पर्व ओसवाल व मयूर राठोड यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमास अभिजीत शाह, मयूर सरनोत, विनोद सोलंकी, जिनेंद्र कावडिया, ऋषिकेश शाह, राजेश सालेचा, आनंद बाफना यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम जैन समाजाच्या एकता, संघटन व हक्कांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण व प्रभावी पाऊल म्हणून पाहिला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment